शेतकऱ्यांनो, उसाचे पाचट, गव्हाचे धसकट जाळू नका; शेतातच सडू द्या, जमिनीचा पोत सुधारतो
By बापू सोळुंके | Published: December 22, 2023 12:05 PM2023-12-22T12:05:04+5:302023-12-22T12:10:01+5:30
लवकरात लवकर जमिनीत कुजावे यासाठी त्यावर बाजारात मिळणाऱ्या औषधाची फवारणी करावी.
छत्रपती संभाजीनगर : उसाचे, गव्हाचे पीक घेतल्यानंतर पाचट-धसकट शेतकरी जाळून टाकतात. याचा जमिनीला आणि वातावरणाला तोटाच होतो. शेतीतज्ज्ञाच्या मते, गव्हाचे धसकट असो किंवा उसाचे पाचट जमिनीतच सडू दिले तर शेतजमिनीतीला सेंद्रिय कर्ब सुधारतो. परिणामी पिकाला पोषक तत्त्व मिळतात आणि उत्पादन वाढते.
उसाचे पाचट जाळू नका
दरवर्षी शेतकरी उसाची तोडणी झाल्यानंतर उसाचे पाचट जाळून टाकतात. उसाचे पाचट जाळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड मेहनत करावी लागते. मात्र, कृषीतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार उसाचे पाचट हे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी एक उत्तम असा सेंद्रिय पदार्थ आहे. हे पाचट शेतातच सडू द्यायला हवे.
मका, गव्हाच्या काड्या, धसकट जाळू नका
गहू पिकाची कापणी झाल्यानंतर अथवा हार्वेस्टरने गव्हाची काढणी केल्यावर शेतात गव्हाच्या काड्या आणि धसकट उभे असते. खरीप हंगामासाठी शेत तयार करण्यासाठी शेतकरी सर्वप्रथम गव्हाच्या काड्या आणि धसकट जाळून टाकतात. मात्र, या काड्या आणि धसकट जाळून न टाकता. शेतकऱ्यांनी त्यावर नांगरणी करावी. जेणे करून हे धसकट जमिनीत सडून त्याचे खत होईल. हे खत पुढील पिकासाठी उत्तम असे टॉनिक असते.
प्रदूषण वाढले, जमिनीसाठीही धोकादायक
दरवर्षी शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामपूर्वी शेतीतील गहू, मका, ज्वारी, बाजरीच्या पिकाचे धसकट, काडी, कचरा,उसाचे पाचट, कापसाच्या पराट्या जाळून टाकतात. यामुळे हवेतील प्रदूषणाचा स्तर वाढतो. वाढलेले प्रदूषण मानवासाठी आणि जमिनीसाठी धोकादायक ठरते, म्हणून शेतातील पिकांचा कचरा जाळू नका, असे आवाहन अभ्यासक करतात.
जमिनीत गाडणे लाभदायक
गहू, मका, ज्वारी, बाजरी पिकाची काढणी झाल्यानंतर उरलेले धसकट, काडी, कचरा, उसाचे पाचट, कापसाच्या पराट्या न जाळता त्यावर रोटाव्हेटर फिरवून अथवा नांगर फिरवून जमिनीत गाडावे. लवकरात लवकर हे जमिनीत कुजावे यासाठी त्यावर बाजारात मिळणाऱ्या औषधाची फवारणी करावी. असे केल्यास जमिनीचा पोत सुधारतो.
-सुरेश बेडवाल, विना मशागत शेतीचे पुरस्कर्ते.
जमिनीची सुपिकता वाढते
शेतातील कोणत्याही पिकाचा पाला, पाचोळा अथवा गव्हाच्या काड्या, उसाचे पाचट शेतात सडू दिल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो. परिणामी जमिनीची सुपीकता चांगली होते आणि पुढील पिकाचे उत्पादन वाढते. उसाचे पाचट असो किंवा अन्य पिकाचा काडी, कचरा जाळल्यास हवेतील प्रदूषणच वाढते.
-प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक