शेतकऱ्यांची वीज तोडणार
By Admin | Published: July 30, 2014 01:07 AM2014-07-30T01:07:07+5:302014-07-30T01:17:40+5:30
पैठण : ज्या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरण्यात येते त्या सर्व प्रकल्पातील पाणीसाठा संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पैठण : ज्या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरण्यात येते त्या सर्व प्रकल्पातील पाणीसाठा संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पातील पाण्याचा उपसा होऊ नये म्हणून शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन कट करण्याचे आदेश महावितरणला देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाने शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी संघर्षाचा पवित्रा घेतला आहे.
यावर्षी मोसमी पाऊस अद्याप समाधानकारक न झाल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. ती तीव्र होण्याची चिन्हे लक्षात घेता सर्व प्रकल्पातील पाणी साठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. धरणाच्या पाण्यावर चालत असलेले कृषी पंप त्वरित बंद करून त्यांची विद्युत जोडणी खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय मोठे, मध्यम, लघु प्रकल्प, लघु तलाव, नदीनाले, विहिरी इ. पाण्याचे उद्भवातून अनधिकृत पाण्याचा उपसा होत असल्यास तो बंद करण्यात यावा. अवैध उपसा करणाऱ्या विद्युत पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करून संबंधितावर गुन्हे दाखल करावेत, असा आदेश तालुका प्रशासनास देण्यात आले आहेत.
जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात पाईपलाईन टाकून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर फळ पिकांच्या बागा मेहनतीने उभ्या केल्या आहेत. गतवर्षी दुष्काळात पदरमोड करून, कर्ज काढून शेतकऱ्यांनी पाण्याची सोय करून मोसंबी, डाळिंब बागा जगवल्या त्या नंतर गारपिटीने या बागांना फटका दिला आहे व आता पाणीपुरवठा बंद होणार असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यात अस्वस्थता पसरली आहे. काहीही झाले तरी यास आम्ही विरोध करू, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. (वार्ताहर)
एमआयडीसीला फक्त २० टक्के कपात
राज्य शासनाने पाण्याचा प्राधान्य क्रम ठरवताना पिणे, शेती व उद्योग असा ठरवला आहे. असे असताना एमआयडीसीची फक्त २० % पाणी कपात केली आहे. मग शेतकऱ्यांचा १०० % पाणीपुरवठा कोणत्या आधारावर बंद करता, अशी भूमिका शेतकऱ्यांचे नेते जयाजी सूर्यवंशी यांनी घेतली असून शेतकऱ्यांची सुद्धा २० % पाणी कपात करा नाहीतर शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे.