‘दैव आले द्यायला, अन् पदर नाही घ्यायला’;‘बॅकवॉटर’मुळे शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:26 PM2019-11-15T12:26:59+5:302019-11-15T12:32:55+5:30
शेतातील माल वाहून आणण्यासाठी होडीचालकाला मोजावे लागतात एका फेरीसाठी ८०० रुपये
- सुनील गिऱ्हे
औरंगाबाद : जायकवाडी धरण तुडूंब भरले असल्यामुळे लगतच्या शेतांमध्ये पिके चांगलीच बहरलेली आहेत. मात्र, शेतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर धरणाच्या ‘बॅकवॉटर’ने अडथळा निर्माण केला आहे. रस्त्यावर कंबराएवढे पाणी असल्यामुळे सावखेडा, पांढरओव्हळ शिवारातील लाखो रूपयांचा शेत माल पडून आहे. ‘दैव आले द्यायला, अन् पदर नाही घ्यायला’अशी परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. शेतमाल घरी आणण्यासाठी ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी आदी कोणतेही वाहन जाऊ शकत नाही. त्यासाठी चक्क होडीचा वापर करावा लागतो. होडीसाठी शेतकऱ्यांना प्रत्येक फेरीला ८०० रूपयाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला शेतीमाल आणणे शक्यच नसल्याने त्याला आता काडी लावून जाळून टाकावा का, अशा उद्विग्न प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
नाथसागर यंदा शंभर टक्के भरले. या धरणाच्या ‘बॅकवॉटर’मुळे गंगापूर तालुक्यातील सावखेडा व पांढरओव्हळ येथे आजही शेतांमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर कंबराएवढे पाणी आहे. त्यामुळे जवळपास अडीचशे एकरहून अधिक क्षेत्रांवरील कपाशी, पपई, ऊस, मोसंबी, संत्रा, केळी ही पिके काढून घरी आणणे शक्य होत नाही. बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रक तर सोडाच पायीसुद्धा पाण्यातून जाता येत नाही. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांचा माल शेतातच सडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याने बळीराजा रडकुंडीला आला आहे. विशेष म्हणजे चोहोबाजूंनी पाणी असल्याने येथील संपादित क्षेत्रातील शेतकऱ्यांची सर्वच पिके पाण्याखाली आहेत. मात्र, संपादनापासून वाचलेल्या शेतकऱ्यांची अडीचशे एकरहून अधिक क्षेत्रावर केळीसह मोसंबी, पपई, कपाशी, संत्रा ही पिके घेतली आहेत. सध्या ही पिके चांगलीच बहरली असून शेतकऱ्यांना रस्त्याअभावी पीक बाजारात नेणे शक्य होत नाही. एक तर रस्त्यात पाणी असल्याने मजूरही आपला जीव धोक्यात घालून शेतात मजुरीसाठी यायला तयार नाहीत.
दुसरीकडे, रस्त्यावरून वाहनांना जाणे शक्य नाही. त्यामुळे येथे होडीशिवाय पर्याय नाही. मात्र, होडीतून किती माल आणणार, या चिंतेत येथील शेतकरी असून, होडीमध्ये माल आणला तरीही एका फेरीसाठी होडी मालक ८०० रुपये घेत असल्याने पिकांसाठी केलेला खर्चही निघणे शक्य होत नाही, यामुळे पिके घेऊन आम्ही गुन्हा केला, असा सवाल येथील शेतकरी बद्रिनाथ खंडागळे यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून कुणीही दखल घ्यायला तयार नाही. केवळ निवडणुकीत लोकप्रतिनिधी आश्वासने देत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
शेकडो हेक्टर ऊस उभाच वाळणार
येत्या काही दिवसांत ऊस गाळप हंगाम सुरू होणार आहे. मात्र, इतर तुरळक शेतमाल शेतकरी होडीने किंवा डोक्यावर आणतील. मात्र, ऊस होडीत किंवा डोक्यावर आणणे शक्य नाही. सध्या जायकवाडी धरण पूर्णक्षमतेने भरल्याने पाण्याची पातळी महिना ते दीड महिना कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे गळीत हंगामासाठी ऊस नेता येणार नसल्याने हा ऊस उभाच वाळणार असल्याचे शेतकरी नवनाथ खंडागळे यांनी सांगितले.
तलाठी आले धावून, ग्रामसेवक गायब
‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रत्यक्ष सावखेडा येथे भेट दिली. त्यावेळी सदरील प्रतिनिधीने तलाठी दौलत सावळे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी त्वरित घटनास्थळी आले. या रस्त्यासाठी पंचनामा करून वरिष्ठांकडे अहवाल सादर केल्याचे त्यांनी सांगितले, तर दुसरीकडे येथील ग्रामसेवकाशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच ग्रा.पं. पदाधिकारी उपस्थित नव्हते. पांढरओव्हळ येथील शेतकरी अमावास्या, पौर्णिमेला गावात दिसत असून, येथील पिकांचे पंचनामेही अद्याप बाकी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींना, जिल्हाधिकाऱ्यांना गावकऱ्यांचे साकडे
जायकवाडी धरण भरल्यानंतर आम्हाला प्रत्येक वेळी या समस्येला सामोरे जावे लागते. आमचा प्रश्न सोडविण्याची तसदी कोणी घेत नाही. यावर्षी अतिवृष्टीमुळे आधीच अर्धी पिके कामातून गेली. आता उरलेला माल आणण्यासाठी, शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेकडो एकर क्षेत्रावरील पिके जागेवर सडणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी दखल घेऊन या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी येथील शेतकरी अरुण पारे, शेख अलीम अकबर, नवनाथ खंडागळे, शेख अकबर, विलास वल्ले, गंगासागर हिरालाल, रमेश निकम, बद्रिनाथ खंडागळे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी केली आहे. त्वरित दखल न घेतल्यास याच रस्त्यातील पाण्यात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.
पुनर्वसनानंतरही समस्या कायम
धरणामुळे सावखेडा, पांढरओव्हळसह आजूबाजूच्या गावातील ५ हजार हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले. यानंतर या दोन्ही गावांतील २५० एकर क्षेत्र संपादनापासून वाचले. याच क्षेत्रावरील शेतांमध्ये जाण्यास रस्ता नाही. खडकुली येथील महानुभाव आश्रम येथूनही शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. शासनाने पुनर्वसन केले. मात्र, येथील रस्ते, पाणी, भूमिगत गटार आदींच्या समस्या कायम असून चोहोबाजूंनी पाण्याने वेढले असतानाही येथे ८ दिवसांपासून पाणीटंचाई आहे.
पाण्यामुळे जिवाला धोका; कुणीही शेतात येईना
सावखेडा तसेच पांढरओव्हळ शिवारात असलेल्या शेतांमध्ये जाण्यासाठी जवळपास ७ कि.मी. रस्ता आहे. या रस्त्यावर पायी जाणेही शक्य नाही. त्यामुळे शेतात पपई, मोसंबी, ऊस, केळी, संत्रा, तोडण्यासाठी तसेच कापूस वेचणीसाठी जास्तीची रोजंदारी देऊनही पाण्यातून जीव धोक्यात घालून मजूर शेतात यायला तयार नाही. यामुळे येथील शेतकरी रडकुंडीला आले असून, पिकवलेला माल जागेवरच सडताना पाहावा लागणार असून, नसता आम्हालाच शेतमाल आमच्या हाताने पेटवून द्यावा लागेल तेव्हाच येथील लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग येईल का, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.