कडा: आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. वारंवार खेटे घालूनही पैसे मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी खाजगी सावकारांचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पैसे मिळावेत यासाठी खुंटेफळ शाखेसमोर गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे. खुंटेफळ येथील डीसीसी बँकेच्या शाखेत २१ गावातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे आलेले आहेत. या शाखेतून तब्बल २५ हजार खातेदारांना पीक विम्यापोटी १४ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. यातील ९ कोटी रुपये खुंटेफळ, पुंडी, बोडखा, घोंगडेवाडी, बाळेवाडी, नांदुर, पिंपळा, सुंदेवाडी, काकडवाडी, धनगरवाडी, पारोडी, बोराडी, खरडगव्हाण, ढोबळसांगवी, वाटेफळ, कोयाळ येथील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत. तर लोणी, सोलापूरवाडी, साकत, वाहिरा, वाघळुज, लमाण तांडा येथील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देण्यास दिरंगाई होत आहे. या बँकेत कर्मचारी संख्या कमी असल्याने पीक विमा वाटपात दिरंगाई होत आहे. तर काही शेतकऱ्यांचे खाते आॅनलाईन करण्यास तांत्रीक अडचण असल्याचेही बँकेतून सांगण्यात येते. तर कित्येकदा शेतकऱ्यांना बँकेत रोकड नसल्याचे सांगण्यात येते. तसेच बीडवरुन रोकड येत असल्याचे सांगूृन बँकेतील अधिकाऱ्यांकडून वेळ मारून नेली जाते. यासह पाच महिन्यांपासून खाते आॅनलाईन होत नसल्याने शेतकरी आता हैराण झाले आहेत. सध्या पेरणीसह लागवडीचे दिवस आहेत. यामुळे शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करावे लागते. अशावेळी शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी गुरुवारपासून उपोषण सुरू केले. बँकेचे शाखाधिकारी लोखंडे म्हणाले, खाते आॅनलाईन नंतर पैसे देऊ. (वार्ताहर)
पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
By admin | Published: July 11, 2014 11:36 PM