कडा: आष्टी तालुक्यातील कडा येथील उपबाजारपेठेत काही शेतकरी हिरवा चारा विक्रीसाठी आणतात. तालुक्यात चारा टंचाई असल्याने पशुधन जगविण्यासाठी हिरवा चारा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागते. आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी दुग्धोत्पादन करतात. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी गायी, म्हशींचे पालन केले आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे जर्शी गायी असल्याने दुग्धोत्पादन मोठ्या प्रमाणात होते. असे असले तरी गेल्या काही दिवसात जनावरांना हिरव्या चाऱ्याची कमतरता भासत असल्याने दुग्धोत्पादनातही घट झाली आहे. आष्टी तालुक्यात डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे जनावरांना चरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर क्षेत्र उपलब्ध होते. यामुळे शेतकऱ्यांना चाऱ्यावर खर्चही कमी होतो. मात्र गेल्या काही दिवसात पाऊस न पडल्याने अजूनही हिरवा चारा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हिरवा चारा उपलब्ध करण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळते.कडा येथे उपबाजारपेठ आहे. या उपबाजारपेठेत दररोज ३० ते ४० टन उसाचा हिरवा चारा शेतकरी विक्रीसाठी आणतात. त्यामुळे येथे चारा खरेदी करण्यासाठी देवळाली, चोभानिमगाव, निंबोडी, शिराळ, खिळद, टाकळी आदींसह आष्टी तालुक्यातील शेतकरी दररोज येतात. येथे अडीच हजार रुपये प्रतिटनाने या हिरव्या चाऱ्याची विक्री होत असल्याचे शेतकरी रावसाहेब गिरी, शिवाजी सरवदे यांनी सांगितले. या वर्षी पाऊस उशिरा पडल्याने जनावरांना हिरवा चारा विकत घेऊन द्यावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढल्याचे काकासाहेब शेळके, मच्छिंद्र गाडे यांनी सांगितले. दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.(वार्ताहर)
हिरव्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
By admin | Published: July 11, 2014 11:35 PM