ऑनलाईन लोकमत
बीड/ माजलगाव : जिथे निसर्गाने मारले तिथे पिकविम्याने शेतक-यांना तारल्याची स्थिती मागील अनेक वर्षांपासून आहे. यामुळे पीकविमा भरण्याबाबत शेतकरी कमालीची जागरूक आहेत. आठवडयाच्या सुरुवातीलाच पिकविमा भरण्यासाठी शेतक-यांनी माजलगांव शहरातील राष्ट्रीयकृत बॅंका तसेच सेतु सुविधा केंद्रावर तोबा गर्दी केल्याचे दिसुन आले. परंतु पिकविमा बॅंकेत भरायचा की सेतु सुविधा केंद्रावर या बाबत अनेक शेतक-यांमध्ये संभ्रम आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतक-यांना सहन करावा लागत असल्यामुळे किमान पिकविम्याच्या माध्यमातुन तरी आपल्या पिकाचे होणारे नुकसान भरपाई होईल या हेतुने शेतक-यांचा ओढा पिकविमा भरण्याकडे आहे. यामुळेच माजलगांव शहरातील राष्ट्रीयकृत बॅंका, सेतु सुविधा केंद्र या ठिकाणी पिकविमा भरण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत. प्रधानमंत्री पिकविमा योजना अंतर्गत शेतकरी हा पिकविमा भरत आहेत. यात सोयाबीन, तिळ, मुग आदी पिकांचा विमा शेतकरी भरण्यास प्राधान्य देत आहेत.
सेतु सुविधा केंद्रांकडुन शेतक-यांची लुट
तालुक्यात एकुण 28 महा ई सेवा केंद्रांसाठी परवानगी मिळालेली आहे.सर्वच सर्कलमध्ये सेतु सुविधा केंद्रास परवानगी आहे. मात्र ; केवळ माजलगांव शहरातच केंद्र चालु असतात. यातील काही केंद्रांची मान्यता ही ग्रामिण भागातील असतांना देखील ते शहरात सुरु आहेत व शेतक-यांकडुन पिकविमा भरण्यासाठी आवाच्या सवा रक्कम वसुल करीत आहेत.