घाटीतील रिक्त पदे त्वरित भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:04 AM2021-05-19T04:04:56+5:302021-05-19T04:04:56+5:30
औरंगाबाद : घाटी, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि शासकीय कर्करोग रूग्णालयातील वर्ग-३ आणि वर्ग-४ संवर्गाची रिक्त पदे त्वरित भरण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री ...
औरंगाबाद : घाटी, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि शासकीय कर्करोग रूग्णालयातील वर्ग-३ आणि वर्ग-४ संवर्गाची रिक्त पदे त्वरित भरण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला दिले असल्याची माहिती आ. सतीश चव्हाण यांनी दिली.
घाटी, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, कर्करोग रूग्णालयातील मंजूर पदे भरावीत, अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत मंगळवारी यासंदर्भात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन सदरील रूग्णालयांमधील वर्ग-३ व वर्ग-४ ची पदे त्वरित भरण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला दिले. तर वर्ग-१ ची पदे ‘एमपीएससी’मार्फत भरली जात असल्याने ही पदेही त्वरित भरण्याच्या सूचना एमपीएससीला दिल्या जातील, सदरील रूग्णालयांसाठी जे मंजूर बजेट आहे, ते तत्काळ वितरित करण्याच्या सूचना देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीस पालकमंत्री सुभाष देसाई, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख तसेच वित्त व वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्र सरकारने कोविड ड्यूटीचे १०० दिवस पूर्ण करणाऱ्या आरोग्य सेवकांना नियमित शासकीय भरतीमध्ये प्राधान्य देण्याचे जाहीर केले आहे. त्याच धर्तीवर राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांना नियमित शासकीय भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी आ. चव्हाण यांनी अमित देशमुख यांच्याकडे केली. अमित देशमुख यांनी या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असे सांगितले.
फोटो ओळ
घाटी रूग्णालयासंदर्भात आयोजित बैठकीत चर्चा करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री सुभाष देसाई, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, आ. सतीश चव्हाण आदी.