वाळूज महानगर : ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सिडको प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी मिळताच मंगळवारपासून ड्रेनेजलाईनच्या कामाला सुरुवात केली. सदरील काम झाल्यानंतर दुर्गंधी व डासांच्या उपद्रवातून कायमची सुटका होणार आहे. छत्रपतीनगर व फुलेनगरवासीयांना काम सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे.
सिडको वाळूज महानगरातील द्वारकानगरी, दिशा कुंज आदी सोसायटींतील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने गत महिन्यात ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, हे काम करीत असताना प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतली नव्हती. शिवाय नवीन केलेला सिमेंट रस्ता फोडून हे काम करावे लागणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने ड्रेनेजलाईनचे काम थांबविले होते. गत आठवड्यात त्रस्त महिलांनी पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याला घेराव घालत याचा जाबही विचारला होता. प्रशासनाने मंगळवारी सकाळी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करून ड्रेनेजलाईनचे पाईप टाकण्याचे काम सुरू केले आहे.