...अखेर क्रांतीचौकातील पुतळ्याची उंची वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:56 AM2018-02-20T00:56:26+5:302018-03-19T13:43:57+5:30
क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामाचे भूमिपूजन टिकाव मारून महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामाचे भूमिपूजन टिकाव मारून महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता केले. या उद्घाटनानंतर शिवप्रेमींनी ढोल, ताशांचा गजर करून या शुभवार्ताचे स्वागत केले.
क्रांतीचौकात उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या वेळीच मनपात पुतळ्याची उंची वाढविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र मागील ५ वर्षांपासून या ठरावाची अंमलबजावणी झाली नव्हती. यावेळी औरंगाबाद सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे महापौर, मनपा आयुक्तांची भेट घेऊन शिवजयंतीच्या मुहूर्तावर पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य न केल्यास समितीतर्फे सायंकाळी भूमिपूजन करण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी भूमीपूजन करण्यात आले. या कामासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करून ठरावाच्या अंमलबजावणीची सूचनाही दिल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी टिकाव मारून भूमिपूजन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, आमदार सतीश चव्हाण, आमदार सुभाष झांबड, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपमहापौर विजय औताडे, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद पाटील, माजी आमदार कल्याण काळे, संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, स्थायी समितीचे अध्यक्ष गजानन बारवाल, विकास जैन, राजेंद्र जंजाळ, त्रिंबक तुपे, अभिजित देशमुख आदींसह हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.