अखेर त्या मॅनहोलमध्ये आणखी एक मृतदेह सव्वा महिन्यानंतर सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:13 AM2019-04-27T00:13:10+5:302019-04-27T00:13:51+5:30
सुखना नदीपात्रातील भूमिगत गटारातून शेतीला चोरून पाणी घेण्यासाठी विद्युत मोटारपंपाचा फुटबॉल साफ करण्यासाठी १८ मार्च रोजी दुपारी ड्रेनेजच्या मॅनहोलमध्ये उतरल्यापासून एक जण गायब झाला होता. तेथेच शुक्रवारी २६ एप्रिल रोजी कुजलेल्या आणि सापळा अवस्थेतील मानवी मृतदेह आढळून आला.
औरंगाबाद : सुखना नदीपात्रातील भूमिगत गटारातून शेतीला चोरून पाणी घेण्यासाठी विद्युत मोटारपंपाचा फुटबॉल साफ करण्यासाठी १८ मार्च रोजी दुपारी ड्रेनेजच्या मॅनहोलमध्ये उतरल्यापासून एक जण गायब झाला होता. तेथेच शुक्रवारी २६ एप्रिल रोजी कुजलेल्या आणि सापळा अवस्थेतील मानवी मृतदेह आढळून आला. हा मृतदेह गायब झालेल्या रामेश्वर केरूबा डांबे (२७, रा. निकळक, ता. बदनापूर, जि. जालना) यांचा असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. डीएनए चाचणी नंतरच हा मृतदेह रामेश्वरचा आहे अथवा नाही, हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुखना नदीतील भूमिगत गटाराच्या मॅनहोलमध्ये मोटारपंप टाकून शेतीसाठी पाण्याचा उपसा करण्यासाठी १८ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास नवनाथ कावडे, जनार्दन साबळे, रामकिसन माने, उमेश कावडे, दिनेश दराखे, प्रकाश वाघमारे आणि रामेश्वर डांबे हे मोटारपंप सुरू करण्यासाठी गेले. चेंबरमध्ये सोडलेल्या मोटारपंपच्या फुटबॉलमध्ये कचरा आणि गाळ अडक ल्याचे त्यांच्या लक्षात आले. गाळात रुतलेला फुटबॉल बाहेर काढण्यासाठी एकापाठोपाठ चार जण मॅनहोलच्या ढाप्यावरील लघुछिद्रातून आत उतरले. मॅनहोलमधील विषारी वायूमुळे अवघ्या काही मिनिटांत ते गुदमरून चेंबरमध्येच कोसळले. यानंतर सर्वांना बाहेर काढले असता उपचारादरम्यान जनार्दन विठ्ठल साबळे (५५, रा. वरझडी), दिनेश जगन्नाथ दराखे (४०, रा. चिकलठाणा) आणि उमेश कावडे यांचा मृत्यू झाला होता. घटनेपासून रामेश्वर डांबे हा तरुण गायब झालेला आहे. पोलीस, अग्निशमन दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी शोधमोहीम राबवून रामेश्वरचा शोध घेतला होता. मात्र, रामेश्वर सापडला नव्हता. दरम्यान आज शुक्रवारी घटनास्थळ परिसरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांनी एमआयडीसी सिडको पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने आज दुर्गंधी येत असलेल्या परिसरात खोदकाम केले असता सापळा आणि कुजलेल्या अवस्थेतील मानवी मृतदेह आढळला. हा मृतदेह रामेश्वर यांचा असण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतची खात्री मृतदेहाच्या डीएनए चाचणीनंतर होणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले.
-------------