औरंगाबाद : ऐतहासिक पर्यटन स्थळे, स्मारके, संग्रहालय सुरु करण्याच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) सोमवारी दिलेल्या आदेशाची जिल्ह्यात गुरुवारपासून ( दि. १७ ) अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबत अंतिम निर्णय घेत सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात मर्यादित प्रवेश संख्या आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या आदेशासह ही परवानगी दिली आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या (एएसआय) अंतर्गत असलेली ऐतिहासिक पर्यटन स्थळे, स्मारके, संग्रहालये १६ जूनपासून उघडण्याचे आदेश भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी एएसआयच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याशी पत्रव्यवहार केला. यानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी बुधवारी सकाळी गुरुवारपासून ( दि. १७ ) जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, स्मारके आणि संग्रहालये उघडण्याची परवानगी दिली. यानुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अंतर्गत औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात असलेली जगप्रसिद्ध वेरूळ- अजिंठा लेणी, बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला आणि खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर या ऐतिहासिक वास्तू अनलॉक होणार आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मागील अनेक दिवसांपासून पर्यटन स्थळे बंद आहेत. अनेक बाबी अनलॉक झाल्यानंतर पर्यटनस्थळे खुली करण्यात यावीत अशी मागणी करण्यात येत आहे. यानुसार एएसआयने सोमवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले की, १६ जूनपासून एएसआयच्या अंतर्गत असलेली सर्व स्मारके, पुरातन स्थळे सुरू करण्यात यावीत, ही स्मारके, पुरातन स्थळे सुरू करताना संबंधित राज्य आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनांच्या नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट केले. यानंतर एएसआयच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देत ऐतिहासिक वास्तू उघडण्याविषयी निर्णय घेण्यासाठी चर्चा केली. यानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी बुधवारी सकाळी आदेश काढत काही नियमांसह गुरुवारी ( दि. १७ ) सकाळी ६ वाजेपासून जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, ऐतिहासिक वास्तू उघडण्यास परवानगी दिली. सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात प्रत्येकी १००० पर्यटकांना यावेळी परवानगी देण्यात आली आहे. तसेच मास्क वापर, सामाजिक अंतर अशा कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद असणार आहेत.