नवजात शिशूंच्या काळजीसाठी अखेर घाटी रुग्णालयाला जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:42 PM2021-01-11T12:42:13+5:302021-01-11T12:44:06+5:30

Government Hospital Aurangabad घाटीतील सर्जिकल इमारतीतील अवस्थेची पाहणी केली असताना अनेक चिंताजनक बाबी आढळून आल्या.

Finally wake up at Ghati Hospital for newborn care | नवजात शिशूंच्या काळजीसाठी अखेर घाटी रुग्णालयाला जाग

नवजात शिशूंच्या काळजीसाठी अखेर घाटी रुग्णालयाला जाग

googlenewsNext
ठळक मुद्देलोकमत इम्पॅक्ट : युद्धपातळीवर बसविले नवे अग्निशमन सिलिंडरबांधकाम, विद्युतीकरणातील त्रुटींचा आराखडा

औरंगाबाद : नवजात शिशूंची काळजी घेण्यासाठी अखेर घाटी रुग्णालय प्रशासनाला जाग आली. घाटीतील सर्जिकल इमारतीतील मुदतबाह्य अग्निशमन सिलिंडर रविवारी युद्धपातळीवर हटवून नवीन सिलिंडर बसविण्यात आले. सर्जिकल इमारतीतील बांधकाम आणि विद्युतीकरणातील त्रुटी आणि आवश्यक कामांसंदर्भात आगामी दोन दिवसांत आराखडाही करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर घाटीतील सर्जिकल इमारतीतील अवस्थेची पाहणी केली असताना अनेक चिंताजनक बाबी आढळून आल्या. यासंदर्भात ‘लोकमत’ने १० जानेवारी रोजी ‘घाटीच्या नवजात शिशू वॉर्डाची स्थिती जोखिमेची’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्तामुळे खडबजून जागे झालेल्या घाटी प्रशासनाने सर्जिकल इमारत, नवजात शिशू, बालरोग विभागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी नवजात शिशू विभागप्रमुख डॉ. एल.एस. देशमुख, डॉ. अमोल जोशी, डॉ. अतुल लोंढे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. प्रीती बिराजदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची उपस्थिती होती.

नवजात शिशू विभागातील वायरिंगची तपासणी करण्यात आली. ही वायरिंग सुस्थितीत असल्याचा निर्वाळा विद्युत अभियंत्यांनी दिला आहे. परंतु सर्जिकल इमारतीतील अन्य वाॅर्ड, विभागांचाही आढावा घेतला जाणार आहे. बालरोग विभागासह सर्जिकल इमारतीतील मुदत संपलेले अग्निशमन सिलिंडर हटवून नवीन सिलिंडर बसविण्यात आले. कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक प्रशिक्षण देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

योग्य ती खबरदारी
सुरक्षेच्या दृष्टीने सर्जिकल इमारतीतील विद्युतीकरण, बांधकामासंदर्भात आवश्यक बाबींचा आगामी दोन दिवसांत बांधकाम विभागाकडून प्रस्ताव केला जाणार आहे. कोणत्या वायर बदलणे गरजेचे आहे, कुठे बाहेर पडण्यासाठी मार्ग गरजेचा आहे का, हे पाहिले जाईल. फायर ऑडिट झालेले आहे. परंतु पुन्हा एकदा हे ऑडिट केले जाईल.
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

Web Title: Finally wake up at Ghati Hospital for newborn care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.