औरंगाबाद जिल्ह्यात आगीचे सत्र सुरूच; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 12:27 AM2018-05-03T00:27:45+5:302018-05-03T00:31:05+5:30

फुलंब्री तालुक्यातील निधोना येथे आग लागून ११ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर १० शेळ्यांना गंभीर इजा झाल्याची घटना मंगळवारी (दि.१) रात्री ११ वाजता घडली. काही शेळ्यांना वेळीच बाहेर काढण्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या आगीत संसारोपयोगी साहित्यासह एकूण ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Fire era in Aurangabad district begins; Loss of millions | औरंगाबाद जिल्ह्यात आगीचे सत्र सुरूच; लाखोंचे नुकसान

औरंगाबाद जिल्ह्यात आगीचे सत्र सुरूच; लाखोंचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देआग लागून ११ शेळ्या भस्मसात : निधोन्यात आग लागून तब्बल ४ लाखांचे नुकसान; प्रशासनाने आर्थिक मदत देण्याची नागरिकांची मागणी

बाबरा : फुलंब्री तालुक्यातील निधोना येथे आग लागून ११ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर १० शेळ्यांना गंभीर इजा झाल्याची घटना मंगळवारी (दि.१) रात्री ११ वाजता घडली. काही शेळ्यांना वेळीच बाहेर काढण्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या आगीत संसारोपयोगी साहित्यासह एकूण ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
येथील शेतकरी सय्यद सिद्धू सय्यद नियाज अली हे गावाजवळच्या डोंगरावर गट नं. २३६ मधील गायरानात वास्तव्यास आहेत. मंगळवारी रात्री सर्व कुटुंबीय घराबाहेर झोपल्यानंतर कुडाने अचानक पेट घेतला.
आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे काही कळण्याच्या आत येथे बांधलेल्या ११ शेळ्यांचा जागीच कोळसा झाला. यावेळी १० शेळ्या आगीत होरपळल्या. इतर १३ शेळ्यांना वेळीच बाहेर काढल्यामुळे त्यांचा जीव वाचला.
या आगीत शेळ्यांसह खताच्या १० गोण्या, धान्य, २२ टीन पत्रे, कपडे, दागिने, रोख रक्कम, असे एकूण ४ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. चार लाखांपेक्षाही जास्त रकमेची नुकसान झाले आहे. माहिती मिळताच तलाठी आनंद शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेमुळे सदर कुटुंबीय उघड्यावर पडले असून, कुटुंबातील आई-वडिलांसह पूर्ण सोळा व्यक्तींचा उदरनिर्वाह मजुरी व शेळ्यांच्या उत्पन्नातून चालत होता.
दरम्यान, मृत शेळ्यांचे शवविच्छेदन पशुधन पर्यवेक्षक डॉ. संदीप खेसर यांनी केले असून, जखमी शेळ्यांवर पशुधन पर्यवेक्षक डॉ. वैरागी यांनी उपचार केले.
शासनाने सदर कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी सेवा सोसायटीचे चेअरमन देवीदास गाडेकर, प्रकाश नरवडे, उपसरपंच सुनील गाडेकर, कडुबा राऊतराय, सांडू राऊतराय, विठ्ठल राऊतराय, सय्यद याकूब गरीब, सय्यद रहीम गरीब, सुनील गाडेकर, सुनील दुलोत, संतोष गाडेकर, शरद गाडेकर आदींनी केली आहे.
कनकशीळ येथे ऊस जळून खाक
बाजारसावंगी : कनकशीळ येथे विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन लागलेल्या आगीत ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
आसद शहानूर पटेल यांच्या गट नंबर ५९ मधील शेतात उसात असलेल्या विद्युत तारांवर रानपाखरे बसल्यामुळे घर्षण झाले. यामुळे उसात ठिणग्या पडून आग लागली. या आगीत ऊस जळून जवळपास ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले. महावितरणने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
आळंद येथे शॉर्टसर्किटने २ लाखांचे नुकसान
आळंद : येथील गट नंबर ७२ मधील घरात शार्टसर्किटमुळे आग लागून जवळपास २ लाख रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
मधुकर खंडू जमधडे या शेतकºयाच्या राहत्या घराशेजारी तारांचे घर्षण होऊन घराला आग लागली. या आगीत घरातील धान्य, दागिने, रोख रक्कम, कपडे व इतर संसारोपयोगी साहित्यासह शेतीची अवजारे, असे एकूण २ लाख रुपयांचे नुकसान झाले.
दरम्यान, आग लागली तेव्हा जमधडे यांच्या कुटुंबातील सदस्य लग्नासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे आग लागल्याचे लवकर निदर्शनास न आल्याने घरातील जवळपास सर्वच साहित्य खाक झाले. घटनेची माहिती मिळताच तलाठी छाया सुरडकर, कोतवाल शेख इब्राहिम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
या घटनेमुळे सदर शेतकरी कुटुंब बेघर झाले असून, त्यांना शासनातर्फे तात्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी सरपंच भारती शेळके, कौतिकराव पायगव्हाण, सुनील तायडे, ग्रामपंचायत सदस्य सोमीनाथ भालेराव आदींनी केली आहे.
आडूळ येथे चाºयाची गंजी जळाली
आडूळ : येथे चाºयाच्या गंजीला आग लागल्याने संपूर्ण चाºयासह पाईप व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजता घडली. विद्युत तारांमध्ये झालेल्या घर्षणामुळे आग लागल्याचे बोलले जात आहे.
आडूळ गावालगत भगवान पुंजाराम पठाडे यांचे गट क्र.१७५ मध्ये शेत असून, या शेतात त्यांनी जनावरांसाठी ज्वारीच्या चाºयाची गंजी रचून ठेवली होती. मात्र, मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास या गंजीला विद्युत तारांचे घर्षण होऊन आग लागल्याने एकूण २ हजार ज्वारीच्या चाºयाच्या पेंढ्या जळून खाक झाल्या.
आग लागल्याचे निदर्शनास येताच भगवान पठाडे यांनी आरडाओरड केल्याने बाजूच्या शेतात काम करीत असलेले शेतकरी अनिल पिवळ, नंदू पिवळ, सारंगधर पिवळ, दिलीप ढोकळे आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने पाण्याअभावी आग लवकर आटोक्यात आली नाही. त्यामुळे शेती उपयोगी साहित्यासह संपूर्ण चारा जळून खाक झाला.
घटनास्थळी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयाने केली आहे. माहिती मिळताच तलाठी राजेंद्र आठवले व कोतवाल शेख अजीम यांनी घटनेचा पंचनामा केला.

Web Title: Fire era in Aurangabad district begins; Loss of millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.