दौलताबाद : ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याला शुक्रवारी दुपारी आग लागल्याने लाखमोलाची वनसंपदा जळून खाक होऊन वन्यजीवांची होरपळ झाली. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरु होते. दरवर्षी किल्ल्याला आग लागते, परंतु याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याने ऐतिहासिक ठेव्याला धोका निर्माण झाला आहे. एवढी मोठी घटना घडूनही वन अधिकारी किंवा कर्मचारी इकडे फिरकले नाहीत.आगीचे कारण कळू शकले नाही. जमिनीपासून जवळपास ७०० फूट उंचावर आग लागल्याने तेथे जाणेही अवघड असल्याने सर्वांचे प्रयत्न अयशस्वी झाले. किल्ला कर्मचारी व औरंगाबाद मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनीही आग विझविण्यासाठी अनेक युक्त्या करुन पाहिल्या, परंतु तेही हतबल होऊन परतले.दौलताबाद किल्ल्याच्या डोंगराला दुपारी चार वाजेच्या सुमारास गणपती मंदिराजवळून आग लागली. यानंतर १० ते १२ किल्ला कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. उन्हाचा पारा जास्त असल्याने त्यात वाराही सुटल्याने बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. दौलताबाद किल्ला हा जगप्रसिद्ध असून दररोज हजारो पर्यटक येथे भेटी देतात. किल्ला परिसर एकूण ३०० एकरचा असून मुख्य किल्ल्याच्या डोंगरालाच पाच एकरमध्ये ही आग लागली. कडक उन्हामुळे मोजकेच पर्यटक किल्ल्यावर होते, त्यांनी आग पाहताच सुरक्षितस्थळी धाव घेतली.वन्यजीवांची होरपळ; पक्ष्यांची घरटेही खाकया आगीत वनसंपदा खाक झाली. पक्षी व सरपटणाºया प्राण्यांनाही या आगीची झळ पोहोचली. या परिसरात मोरांची संख्या जास्त आहे. आग लागताच पक्षी या झाडावरुन त्या झाडावर सैरावैरा उडताना दिसत होते. झाडांवरील अनेक पक्ष्यांची घरटी जळून खाक झाली. मोरही सुरक्षित स्थळी धावताना दिसले. खंदकमध्येही आग पसरल्याने मोठी झाडे खाक झाली. येथील पक्ष्यांचा चिवचिवाट मनाला सुन्न करणारा होता. किल्ल्यावर बारादरी, गणपती मंदिर, संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या पादुका, अनेक तोफा असून या ऐतिहासिक वास्तू मात्र सुरक्षित आहे.दोन वर्षांपूर्वी कर्मचाºयाचा मृत्यूमागील एक वर्ष वगळता प्रत्येक वर्षी या किल्ल्याच्या डोंगराला आग लागते. यावर उपाययोजना कुणीही करीत नसल्याने किल्ल्याला हानी पोहोचत आहे. दोन वर्षापूर्वी अशीच आग लागल्यानंतर ती विझविण्याच्या प्रयत्नात अब्दुल कदीर या कर्मचाºयाचा होरपळून मृत्यू झाला होता. यावर गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे.भारतीय पुरातत्व अधिकारी, कर्मचाºयांचे शर्थीचे प्रयत्नया किल्ल्यावरील भारतीय पुरातत्व विभागाचे संरक्षण सहायक संजय बी. रोहनकर यांनी सांगितले की, आज आगीची माहिती मिळताच मी स्वत: कर्मचारी मच्छिंद्र देवरे, सतीश गायकवाड, बाबासाहेब आढाव, आसाराम काळे, सीताराम धनाईत, संजय घुसळे, फकीरचंद गायकवाड यांच्यासह दहा -बारा कर्मचारी घेऊन घटनास्थळी गेलो. जॅकेट घालून व दहा उपकरणे घेऊन आग विझवायला सुरुवात केली. परंतु वारा व उन्हामुळे आमचे सर्व प्रयत्न असफल झाले. या आगीत मात्र ऐतिहासिक वास्तूचे काहीही नुकसान झाले नाही. पर्यटकही सुरक्षित असून सीसीटीव्ही कॅमेºयाची वीजही लगेच बंद केली.
ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:24 AM