औरंगाबाद : शेवगाव तालुक्यातील मुंगी येथील वाळूमाफियाच्या पुतण्यावर दुचाकीस्वाराने गोळीबार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री जालाननगरात घडली. या घटनेत जखमी झालेला तरुण वेदांतनगर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. पोलिसांनी त्याला मेडिकल मेमो देऊन रुग्णालयात पाठविले. माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
इमरान शेख अहमद शेख (२५, रा. मुंगी, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमी इमरान हा कुख्यात वाळूमाफिया शेख युनूसचा पुतण्या आहे. तो गुरुवारी रेल्वेस्टेशन परिसरातील जालाननगरात राहणाऱ्या अदनान नावाच्या मित्राकडे आला होता. रात्री ७:३० वाजेच्या सुमारास तो अर्बन ग्रोसरी या दुकानासमोर उभा होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तीने त्याच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली. ही गोळी इमरानच्या कमरेला चाटून गेल्याने तो सुदैवाने बचावला. जखमी इमरान वेदांतनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, पोलीस निरीक्षक मयेकर, पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. हा हल्ला करण्यात आला अथवा बनाव आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला. सातारा ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली.
सुपारी देऊन हल्ला केल्याचा संशय सूत्रांनी सांगितले की, इमरानचे वडील आणि शेख युनूस यांच्यात भांडण सुरू आहे. यातून सुपारी देऊन इमरानवर गोळी झाडण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मुंगी येथील प्रार्थनास्थळाविषयी इमरानच्या नातेवाईकांचा वाद सुरू आहे. यातून हा हल्ला झाला असावा, असा अंदाजही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.