सोयगाव : सध्या जैव विविवधतेने बहरलेल्या सोयगाव येथील वेताळवाडी जंगलात ८० प्रकारच्या विविध वनस्पती आणि फुले बहरली आहेत. त्यानुसार आता कास पठाराच्या धर्तीवर सोयगाव येथे मराठवाड्यातील पहिले फुल हब तयार होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी दिली.
मंगळवार दि. ६ रोजी रात्री उशिरापर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी सोयगावच्या वेताळवाडी जंगलात पहिला अभ्यास दौरा पूर्ण करून जागेचीही पाहणी केली. त्यामुळे सोयगावच्या वेताळवाडी जंगलात कास पठार फुलणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. सोयगाव तालुक्याच्या जंगलाची मंगळवारी पाहणी करण्यात आली.
सोयगावच्या वेताळवाडीचे जंगल अजिंठा डोंगर रांगांनी वेढले आहे. या जंगलात विविध प्रजातीची बहुरंगी फुले बहरलेली असल्याचे आढळून आल्याने तातडीने या फुलांच्या प्रजातींची नावे संकलित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदावले यांनी दिले असून या कामासाठी सोयगाव पंचायत विभाग कामाला लागला आहे. फुलांच्या बिया संकलित करण्याचे काम बुधवारी हाती घेण्यात आले आहे.
वेताळवाडीसह, गलवाडा, सोयगाव आदी भागातही विविध फुले बहरलेली असून त्यासोबतच औषधी वनस्पतीही आढळून आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी सांगितले.