छ. संभाजीनगर - भाजपा नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाची मोठी सभा झाली. या सभेतून शाह यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर हल्लाबोल केला, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही टीका केली. शाह यांनी मोदी सरकारने केलेल्या कामाची माहिती देत, गेल्या ९ वर्षात महाराष्ट्राला भरभरुन निधी केंद्र सरकारकडून देण्यात आल्याचंही सांगितलं. दरम्यान, येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नुकतेच भाजपात प्रवेश केलेले खासदार अशोक चव्हाण यांचीही भाषणे झाले. यावेळी, चव्हाण यांनी अमित शाहंसमोर मराठा आरक्षणावर भाष्य केलं.
राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे. मात्र, उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील सगेसोयरेच्या अंमलबजावणीवर ठाम असून मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणी करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी थेट मराठा नेत्यांनाही लक्ष्य केलं होतं. आता, मराठा आरक्षणासंबधितील समितीमध्ये काम केलेल्या अशोक चव्हाण यांनी थेट अमित शाह यांच्यासमोर छत्रपती संभाजीनगरमधील सभेत मराठा आरक्षणावर भाष्य केलं.
मला भाजपात आल्यानंतर जनसभेला संबोधित करण्याची ही पहिलीच संधी दिली. भाजपा परिवारात मला सामावून घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वांचे लाख लाख धन्यवाद मानतो. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर २४ तासांतच मला राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली, तो माझ्यावर ठेवलेला मोठा विश्वास आहे, काम करण्याची जबाबदारी मला देण्यात आल्याचे मी समजतो. देशभरात आपण ४०० पारचा संकल्प केला आहे, पण मराठवाडाच नाही, तर महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा भाजपा महायुतीच्या निवडून येणार, त्यासाठी आम्ही योगदान देणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं.
मराठा आरक्षणाबद्दल मानले आभार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असे म्हणत संभाजीनगरच्या सभेतून अमित शाह यांच्यासमोर अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन सरकारचं अभिनंदन केलं. तसेच, फार वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न अडकला होता, तो मार्गी लागला. सगेसोयरेंचा प्रश्नही कायदेशीर मार्गाने प्रक्रिया पूर्ण होऊन मार्गी लागणार आहे, त्यामध्ये आम्हाला शंका नाही, असेही चव्हाण यांनी म्हटले. दरम्यान, भाषणाच्या शेवटी अशोक चव्हाण यांनी अब की बार ४०० पारचा नाराही दिला.
मुंबईचा चेहरामोहरा बदलला
विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्र हेच आमचं पहिलं ध्येय असणार आहे. मराठवाड्यातील लोकांना विकासाची भूक आहे, हा विकास करण्यासाठी देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणि आपल्या रुपाने मजबूत नेतृत्व मिळालं आहे. देशात रेल्वे कनेक्टीव्ही चांगली झाली, हायवे झाले, शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना आणल्या गेल्या, ५-७ वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदललाय. महाराष्ट्रात जे दृश्य पाहतो, ती केवळ आश्वासन नसून प्रत्यक्षात दिसत आहेत. देशातील तिर्थक्षेत्रांचा विकास मोठा झालाय. एम्स कॉलेजची संख्या १६ वर गेलीय, मेडीकल कॉलेजची संख्या ३८७ वरुन ६५४ वर गेलीय. गरिब नागरिकांसाठी ५ लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची योजना मोदींमुळेच सुरू झाल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटले.