छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही महिन्यांपासून देशभरात विविध ठिकाणांहून इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत. शहरातील छावणीतील आगीच्या घटनेत ई-व्हेइकल चार्जिंगला लावलेली होती आणि चार्जर दुकानाच्या आत होते. या चार्जरचा स्फोट झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे ई-वाहन आणि आगीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
राज्य शासनाने पर्यावरण संवर्धनाकरिता इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण अवलंबले आहे. अशा दुचाकींना मोटार वाहनकरातून सूट दिलेली आहे. ताशी २५ किमीपेक्षा कमी वेगाच्या वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणीची आवश्यकता नाही. ते चालविण्यासाठी अनुज्ञप्ती (लायसन्स)ची आवश्यकता नाही. त्यामुळे २५० वॅट बॅटरीच्या स्कूटरच्या खरेदीचा वेग वाढला आहे. या वाहनांचा वेग मर्यादित असल्यामुळे अनेकजण दुचाकींमध्ये बेकायदेशीर बदल करून वेग वाढविण्याचा प्रयत्न करतात. बॅटरीची क्षमता वाढविल्याने वाहनांचा वेग वाढत असला, तरी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने ते धोकादायक आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अशाच काही दुचाकींना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरात असे बेकायदा बदल करणाऱ्या वाहने उत्पादित करणारे उत्पादक आणि वितरकांची २०२२ मध्ये तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. अनेक ई-दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. तरीही ई-वाहने आणि आगीचा प्रश्न कायम आहे.
छावणीतील आगीच्या घटनेप्रकरणी पोलिसांकडून पत्र आल्यास ई-व्हेइकलची तपासणी केली जाईल, असे आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
ई-दुचाकी चार्ज करताना ही घ्या काळजी....- वाहन चार्ज करताना उत्पादकाने दिलेल्या वायर आणि अडॉप्टरचा वापर करावा.- दुचाकी रात्रभर चार्ज करू नका. ओव्हरचार्ज केल्यामुळे बॅटरी, चार्जरचा स्फोट होण्याचा धोका नाकारता येत नाही. तसेच बॅटरीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.- पॉवर एक्स्टेंशनचा वापर टाळावा; थेट स्वीचवरून दुचाकी चार्ज करावी.- शक्य असल्यास धुराची माहिती देणारे यंत्र बसवावे.- जुन्या लिथियम-आयन बॅटरी घरात ठेवण्याचे टाळावे- सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चार्ज करताना किंवा चार्जिंगसाठी फक्त मान्यताप्राप्त चार्जिंग स्टेशनचा वापर करावा.
जिह्यातील ई-वाहनांची संख्या- ई-दुचाकी- १३,५२१- कार -७५२- इलेक्ट्रिक रिक्षा (लोडिंग) -३५६- बस - ७- ई-रिक्षा (प्रवासी)- ५२