औरंगाबाद : रेल्वेस्टेशन ते एपीआय कॉर्नर रिक्षा प्रवासात वृद्धेच्या पिशवीतील पाच तोळ्याच्या सोन्याच्या दोन बांगड्या सहप्रवाशांनीच पळविल्याची घटना १ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.पोलिसांनी सांगितले की, मुकुंदवाडी परिसरातील कासलीवाल मार्केट येथील रहिवासी मनकरनाथ आत्माराम पंडित (६०) या नाशिक येथे राहणाऱ्या मुलाच्या घरी धार्मिक कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. नाशिक येथून त्या १ एप्रिल रोजी जनशताब्दी एक्स्प्रेसने औरंगाबादला आल्या. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्या रेल्वेस्टेशन येथून मुकुंदवाडीकडे जाण्यासाठी रिक्षात बसल्या. त्यावेळी रिक्षाचे वीस रुपये भाडे रिक्षाचालकाने त्यांना सांगितले. त्या रिक्षात बसल्यानंतर काही वेळात अन्य तीन जण प्रवासी म्हणून मनकरनाथ यांच्या शेजारी रिक्षात बसले. यामुळे शेजारी ठेवलेली त्यांनी त्यांची बॅग उचलून जवळ ठेवली. त्यांच्यामुळे दाटी होत असल्याने प्रवासी त्यांना आण्टी उधर सरको, जगह दो, असे म्हणत होता. रिक्षात बसण्यास अडचण होत असल्याने चालकाने सिडको बसस्थानक उड्डाणपुलाजवळील एका वर्तनमापत्राच्या कार्यालयाजवळ रिक्षा थांबविली आणि येथे उतरा, भाड्याचे पैसे द्या, असे तो म्हणाला. त्यामुळे मनकरनाथ या रिक्षातून उतरल्या आणि त्यांनी त्याला वीस रुपये प्रवास भाडे दिले. त्यानंतर त्यांनी रिक्षातून त्यांची बॅग घेतली. त्यावेळी बॅगची चेन त्यांना उघडलेली दिसली. त्यामुळे त्यांनी बॅगमध्ये हात घातला असता बॅगमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या पाच तोळ्याच्या दोन बांगड्यांचे पाकीट त्यांना त्यात दिसले नाही. तोपर्यंत रिक्षाचालक तेथून निघून गेला होता. यामुळे मनकरनाथ यांना रिक्षाचा क्रमांकही पाहता आला नाही. सहप्रवासी म्हणून बसलेल्या तीन जणांनीच आपल्या बॅगची चेन उघडून त्यातील पाच तोळ्याच्या सोन्याच्या दोन बांगड्यांचे पाकीट चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती त्यांनी लगेच पतीला फोन करून कळविली. त्यांनतर त्यांचे पती तेथे आले आणि नंतर त्यांनी सिडको बसस्थानक परिसरात त्या रिक्षाचा शोध घेतला. मात्र, रात्र झाल्याने ते घरी गेले. दरम्यान मंगळवारी सकाळी त्यांनी एमआयडीसी सिडको ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार नोंदविली.चौकटरिक्षाचालकाचा शोध सुरूएकट्या प्रवाशाला रिक्षात बसविल्यांनतर काही साथीदारांना रिक्षात बसवितात. प्रवाशाची नजर चुकवून त्यांच्या बॅगेतील किमती ऐवज पळवितात. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध सुरू केला.
रिक्षातील सहप्रवाशांनी पळविल्या वृद्धेच्या पाच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 12:02 AM
औरंगाबाद : रेल्वेस्टेशन ते एपीआय कॉर्नर रिक्षा प्रवासात वृद्धेच्या पिशवीतील पाच तोळ्याच्या सोन्याच्या दोन बांगड्या सहप्रवाशांनीच पळविल्याची घटना १ ...
ठळक मुद्देएमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा : रेल्वेस्टेशन ते सिडको उड्डाणपूल चौक परिसरातील घटना