- शांतीलाल गायकवाड
औरंगाबाद : पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात काँग्रेसच्या सहानुभूतीची मोठी लाट आली. या लाटेने काँग्रेसला लोकसभेच्या आठव्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले; परंतु आतापर्यंत काँग्रेसची पाठराखण करणाऱ्या औरंगाबादकरांनी सहानुभूतीची ही लाट रोखून समाजवादी काँग्रेसचे उमेदवार साहेबराव पाटील डोणगावकर यांना विजयी केले.
दहशतवाद्यांना हुसकाविण्यासाठी सुवर्ण मंदिरात लष्कर घुसविल्याच्या रागातून शीख अंगरक्षकांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ३० आॅक्टोबर १९८४ मध्ये हत्या केली. राजीव गांधी यांना हंगामी पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर दोन महिन्यांत झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशभरात काँग्रेस सहानुभूतीची लाट आली. करिश्माई नेतृत्व असलेले पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांनाही शक्य झाले नाही, एवढ्या ४०४ जागा राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला मिळाल्या. तरीही पंजाब व आसाममध्ये अशांतता असल्याने निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. या दोन राज्यांत निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसचे संख्या बळ ४१४ वर पोहोचले होते.
अशा या वातावरणात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादकरांनी काँग्रेसचा उधळलेला वारू रोखून धरला. काँग्रेस (एस)चे उमेदवार साहेबराव पाटील डोणगावकर यांनी काँग्रेस (आय)चे उमेदवार अब्दुल अजीम अब्दुल हमीद यांचा ९२ हजार ४१९ मतांनी दणदणीत पराभव केला. या निवडणुकीत १३ उमेदवार उभे होते. त्यातील ११ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या होत्या. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये डोणगावकर यांचा काँग्रेस उमेदवार काझी सलीम यांनी पराभव केला होता.
सरपंच ते खासदार...साहेबराव कचरू पाटील हे डोणगावचे (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) रहिवासी. त्यांचा जन्म ६ जून १९४८ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण अहमदनगरच्या सोसायटी शाळेत झाले. अंडर मॅट्रिक असलेले डोणगावकर हे कृषिवत्सल राजकारणी होते. काँग्रेसमधून बाहेर पडून ते शरद पवार यांच्यासह काँग्रेस (एस) मध्ये गेले. काँग्रेस एसचे पाच वर्षे जिल्हाध्यक्ष होते. डोणगावचे १३ वर्षे सरपंचपदी राहिलेले डोणगावकर आठव्या लोकसभेचे सदस्य झाले. गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपद त्यांनी भूषविले. गंगापूर तालुका शिक्षण संस्थेचे ते १० वर्षे सरचिटणीस होते. ९ एप्रिल २०११ रोजी त्यांचे निधन झाले.
आठव्या लोकसभेत पहिल्या महिला उमेदवारऔरंगाबाद मतदारसंघात लढविल्या गेलेल्या लोकसभेच्या यापूर्वीच्या सात निवडणुकीपर्यंत एकही महिला उमेदवार नव्हती. आठव्या लोकसभेत शकुंतला रेणुकादास नाईक यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली; परंतु त्यांना केवळ ६९६ (टक्के ०.१४) मते मिळाली. १३ उमेदवारांच्या यादीत ही मते सर्वात कमी होती.