- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : हिमायतबाग ही ऐतिहासिक स्थापत्य कलेचा ठेवा मानली जाते. येथील पाणीपुरवठ्याच्या नहरी ही शहरासाठी भूषणावह बाब होय; पण येथे येणाऱ्यांचा हिरमोड होत असून, वृक्षतोडीमुळे बागांवर अवलंबून पक्षी, प्राण्यांची अन्नसाखळी संपुष्टात येत आहे.
पुरातत्व विभाग, मनपा, कृषी विभागाने या बागेचे पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या बागेत शहरातील ज्येष्ठ नागरिक सकाळ-सायंकाळ व्यायामासाठी जातात. शाळा, महाविद्यालयातील सहली येतात. अनेक फळबाग, तसेच रानमेवा मिळण्याचे ठिकाण मानले जाते.हिमायतबागेत २५ मोर आहेत, १२ प्रकारचे साप आढळतात, १८२ प्रकारचे पक्षी आहेत. ५२ प्रकारची फुलपाखरे आहेत. फळझाडांना पूरक असलेल्या पक्ष्यांची अन्नसाखळी काटेरी झाडेझुडपे कापल्याने पक्ष्यांना अंडी घालणे कठीण झाले आहे. काटेरी झाडाझुडपात अंडी टाकल्याने ती सुरक्षित असतात, तेथे पिल्लांना धोका नसतो, असा पक्ष्यांचाही समज आहे. फळझाडांना नुकसान पोहोचविणारे कीटक मोर व पक्षी खातात. फूलझाड हे परागकणांसाठी गरजेचे आहे. तेच तोडले जात आहे.
रविवारी स्वयंस्फूर्त स्वच्छता मोहीम....स्वच्छता मोहिमेतून युवकांच्या ग्रुपने प्लॅस्टिक व दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच जमा केला होता. त्यावेळी पोलीस ठाण्याच्या पथकाने दोन वेळी गस्त सुरू केल्याने तळीरामांची संख्या घटली आहे. दर रविवारी स्वयंस्फूर्त स्वच्छता मोहीम होते.
पक्ष्यांना सुरक्षितता राहिली नाही...ऐतिहासिक बागेत पक्ष्यांना सुरक्षितता राहिलेली नाही. वृक्षतोडीवर बंधने घालावी, कारण अन्नसाखळी जर टिकली तर पक्ष्यांच्या संख्यावाढीस फायदा होणार आहे.- डॉ. किशोर पाठक, (मानद वन्यजीव सदस्य)
यंदा घनदाट वृक्षलागवड...१० ते १२ हजारांपेक्षा अधिक झाड, वेली, आंबा, चिकू, जांभूळ, चिंच, गोरख चिंच, कवठ, बोअर, करवंद तसेच इतरही फळझाडे रोपवाटिकेत आहेत. बागेच्या बाजूच्या जागेत घनदाट वृक्षलागवडीसाठी यंदा नियोजन आहे. त्यामुळे पक्ष्यांना त्याचा फायदा होईल. कुंपणही निर्माण होईल.-डॉ. एम. बी. पाटील, (प्रभारी अधिकारी, फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, औरंगाबाद)