औरंगाबाद : सक्तीच्या रजेचा कालावधी १५ एप्रिल रोजी संपल्यानंतरही शहराचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव हे रुजू झाले नाहीत. आयुक्त यादव यांची आता अन्य ठिकाणी बदली होईल आणि शहराला नवे पोलीस आयुक्त प्राप्त होतील, या चर्चेला सध्या सर्वत्र उधाण आले आहे.
शहरातील कचरा टाकण्यावरून ७ मार्च रोजी मिटमिटा येथे जोरदार दंगल झाली आणि यानंतर पोलिसांनी कायदा हातात घेत सामान्यांना घरात घुसून झोडपून काढले. त्यांच्या वाहनांचे नुकसान केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी पोलीस महासंचालक आणि अतिरिक्त गृह सचिव यांच्या समितीकडून करण्याचे आश्वासन दिले आणि पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवित असल्याची घोषणा केली.
पोलीस आयुक्त १६ मार्चपासून सक्तीच्या रजेवर गेले. रजेवर जाताना त्यांनी नाराजी व्यक्त करीत पुन्हा या शहरात येण्याची इच्छा नाही, असे विधान केले होते. तेव्हापासून औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे पोलीस आयुक्तांचा अतिरिक्त पदभार सांभाळत आहेत. भारंबे यांनी प्रभारी असूनही शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी खुले चर्चासत्र घेतले. यासोबतच वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना मुंबईतील इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्राफिक मॅनेजमेंट येथे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि ५० कर्मचाऱ्यांचा एक गट प्रशिक्षणासाठी पाठविला. पोलीस आयुक्तांची ब्रँच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांची त्यांनी तडकाफडकी बदली केली.
कांबळे यांना आयुक्त यादव यांनी सहा महिन्यांपूर्वीच गुन्हे शाखेत नियुक्त केले होते. सक्तीच्या रजेवर असलेले यादव यांची अन्य ठिकाणी बदली केल्या जाईल आणि भारंबे यांनाच आयुक्तपदी नियुक्त केले जाईल अथवा नवीन पोलीस आयुक्त शहराला प्राप्त होईल, अशी चर्चा महिनाभरापासून शहरात सुरू आहे. विशेष म्हणजे आयुक्तांच्या रजेचा कालावधी दोन दिवसांपूर्वी संपला, तरीदेखील ते रु जू झाले नाहीत. यावरून ही चर्चा खरीच असल्याचे बोलले जात आहे.
गुन्हे शाखा सुस्तावलीपोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांची बदली झाल्यापासून ठाणेदारांकडून घरफोड्यांच्या घटनांची माहिती गुन्हे शाखेला लगेच दिली जात नाही. परिणामी, शहरातील अनेक घरफोड्यांचा तपास अद्याप लागलेला नाही. एटीएम गोळ्या झाडणारा आणि पिस्टल चोरणाराही गायब आहे. परिणामी, गुन्हे शाखा सध्या सुस्तावली असल्याचे दिसून येते.