पर्यटन, शिक्षण, नोकरी आणि वैद्यकीय मदत या मुख्य कारणांमुळे औरंगाबादचे नागरिक परदेशात जातात आणि विदेशातील लोक औरंगाबादला येतात. परंतू आता कोरोनामुळे नोकरीनिमित्त बाहेरदेशात गेेलेल्या औरंगाबादकरांचे शहरात येणेही खूप कमी झाले आहे. शिक्षण आणि नोकरीनिमित्त काही लोकांनी आता बाहेर पडण्यास सुरूवात केली आहे, पण त्याचे प्रमाणही गतवर्षांच्या तूलनेत खूपच कमी आहे. शहरात येणारे विदेशी पर्यटक तर पुर्णपणे थांबले आहेत. या सगळ्याचा परिणाम विदेशी चलनाच्या देवाण- घेवाणीवर झाला असून हा व्यवसाय अवघ्या ३० टक्क्यांवर आला आहे.
याविषयी सांगताना संबंधित कंपनीचे अधिकारी म्हणाले की, सध्या औरंगाबादेतून बाहेर पडणारे लोक दुबई, अमेरिका, जर्मनी आणि मालदिव येथेच जात आहेत. यापैकी मालदिवचा पर्याय औरंगाबादकरांकडून पर्यटनासाठी निवडला जात आहे. पण मागील वर्षीच्या तुलनेत पर्यटनासाठी मालदीवला जाणाऱ्या औरंगाबादकरांचे प्रमाण अवघे १० ते १५ टक्केच आहे.
चौकट :
- विदेशी पर्यटक शहरात ५ ते ६ दिवस राहण्याच्या हिशेबाने येतात. याशिवाय त्यांची पैसे खर्च करण्याची मानसिकता आणि क्षमता भारतीय पर्यटकांपेक्षा खूप जास्त असते. याचा फायदा हॉटेल व्यावसायिकांपासून ते पर्यटन स्थळी असणाऱ्या फेरीवाल्यांपर्यंत सगळ्यांनाच व्हायचा. तो आता पूर्णपणे थांबलेला आहे.
- हिमरू शाल, मफलर, बेडसीट याप्रमाणेच हस्तकलेच्या वस्तूही विदेशी पर्यटकांकडूनच अधिक प्रमाणात घेतल्या जायच्या. या सगळ्या व्यवहारातून मोठ्या प्रमाणावर होणारी विदेशी चलनाची देवाण- घेवाण आता जवळपास ठप्प झाली आहे.