गांधेली शिवारात सतर्क तरुणांमुळे वाचली तलावात बुडणारी ४ मुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:05 PM2018-03-30T13:05:31+5:302018-03-30T13:11:07+5:30
शाळेला दांडी मारून गांधेली शिवारातील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांना तलावात बुडत असताना सतर्क तरुणांनी वाचविले.
औरंगाबाद : शाळेला दांडी मारून गांधेली शिवारातील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांना तलावात बुडत असताना सतर्क तरुणांनी वाचविले. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गांधेली परिसरातील लहान तलावात घडली.
चिकलठाणा येथील एका शाळेत शिकणारी बारा ते चौदा वयाची पाच मुले (सर्व रा. पुष्पक गार्डन, चिकलठाणा) दुपारी शाळेला दांडी मारून गांधेली शिवारात फिरायला गेली. गांधेली शिवारातील एका तलावावर गेल्यानंतर त्यांना पोहण्याचा मोह झाला आणि त्यांच्यापैकी चार मुलांनी तलावात उड्या घेतल्या. यावेळी एक मुलगा खोल पाण्यात बुडू लागल्याने तलावाबाहेर असलेल्या मुलाने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
यावेळी त्या मुलाला वाचविण्यासाठी अन्य तीन मुले गेली. मात्र, त्यांनाही पोहायला येत नसल्याने ती पण पाण्यात बुडू लागली. यावेळी मुलांच्या ओरडण्याच्या आवाजाने तेथील एका झाडाखाली बसलेले सय्यद फेरोज (रा. गांधेली), कृष्णा भगुरे, शेख अख्तर, खैरूद्दीन शेख, रेहान शेख (रा. चिकलठाणा) यांनी धावत जाऊन तलावात उड्या घेतल्या आणि मुलांना बाहेर काढले. यावेळी तरुणांनी त्या मुलांकडे त्यांच्या वडिलांचे मोबाईल नंबर मागितले. तेव्हा, आई-वडिलांना सांगितले तर ते मारतील, असे म्हणू लागली. नंतर तरुणांनी ओळखीच्या लोकांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. मात्र, त्यांच्या वडिलांसोबत संपर्क झाला नाही, असे सय्यद फेरोज म्हणाले.
तीन वर्षांपूर्वी दगावली होती तीन मुले
गांधेली शिवारातील या तलावात तीन वर्षांपूर्वी तीन मुले दगावली होती. या तलावात बऱ्यापैकी पाणीसाठा असल्याने उन्हाळा लागल्यापासून शालेय अनेक तरुण तेथे पोहण्यासाठी जातात. आजच्या घटनेत तरुणांनी मदत केली नसती तर अनर्थ घडला असता, अशी चर्चा गांधेलीमध्ये सुरू आहे.