औरंगाबाद: सिडकोत अंगण झाडणाऱ्या अथवा एकटी महिला गाठून तिच्या गळ्यातील सोनसाखळी, मंगळसुत्र हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला गुन्हेशाखेने अटक केली आहे. या चोरट्याने चार महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावल्याची कबुली देत लुटलेले मंगळसुत्र आणि उघड्यातून पळविलेले दोन मोबाईलसह दोन मोटारसायकली असा सुमारे दोन लाखाचा ऐवज पोलिसांना काढून दिला.
राजेंद्र सुपडा चंडोल (वय २६,रा. जनुना, ता. बुलडाणा)असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. याविषयी गुन्हेशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत म्हणाले की, सिडकोसह शहराच्या वेगवेगळ्या भागातून मंगळसुत्र चोरीच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्याचा तपास करीत असताना महिलांचे मंगळसुत्र पळविणाऱ्या वेगवेगळ्या आणि शहराबाहेरील गँग असल्याचे स्पष्ट झाले. यात पायी मंगळसुत्र चोरणारा चोरटा आणि दुचाकीवरून महिलांचे मंगळसुत्र हिसकावणारे असे हे आरोपी आहेत.
पायी येऊन महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरणाऱ्या संशयित सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्याचे छायाचित्रे मिळताच पोलिसांनी तपासचक्रे फिरविल्यानंतर तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील मोबाईल चोरटा राजेंद्र चंडोल असल्याचे समजले. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद,उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे ,पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, कर्मचारी संतोष सोनवणे, योगेश गुप्ता, नंदलाल चव्हाण, रितेश जाधव, लखन गायकवाड, सरीता भोपळे आणि अनिल थोरे यांच्या पथकाने राजेंद्रला त्याच्या गावातून ताब्यात घेतले.
न्यायालयाकडून पोलीस कोठडी घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सिडकोत अंगण झाडणाऱ्या एकटीच असलेल्या चार वेगवेगळ्या महिलांचे मंगळसुत्र हिसकावून नेल्याचे सांगितले. याशिवाय दोन वेगवेगळ्या घरातून मोबाईल चोरल्याची कबुली देत घरात लपवून ठेवलेला चोरीचा ऐवज पोलिसांना काढून दिला.