औरंगाबाद : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे संपूर्ण काम माझा मुलगा पाहतो. त्याच्याकडून नोकरीचे खात्रीशीर काम होऊ शकते, अशी थाप मारून ब्यटीपार्लर चालविणाऱ्या महिलेने एका दांम्पत्याकडून २० लाख रूपये उकळले. त्याशिवाय 'नोकरी लावुन देणे करारनामा' १०० रुपयांच्या बॉण्डवर लिहुन दिल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात महिलेच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
सुरेखा विवेक काटे (५३, रा. दशमेशनगर) असे बॉण्डवर लिहुन देणाऱ्या आरोपी महिलेचे नाव आहे. एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक अशोक रसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी सुरेखा काटे हिने १६ सप्टेंबर रोजी दिपाली संदीप कुलकर्णी व संदीप कमलाकर कुलकर्णी या दांम्पत्याच्या भाचास उद्योग विभागात नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखविले. सुरेखा हिचा मुलगा केदार काटे हा उद्योगमंत्री उदय सामंत यांचे संपूर्ण काम पाहत असल्याची बतावणीही महिलेने केली. त्यामुळे कुलकर्णी दांम्पत्याचा नोकरीचे खात्रीशीर काम होणार असल्याचा विश्वास बसल्यामुळे त्यांनी काटेला नोकरीसाठी २५ लाख रुपये देण्याचे ठरविले. त्यासाठी काटे हिने १६ सप्टेंबर रोजी रोख २० लाख रूपये द्यावेत आणि उर्वरित ५ लाख रूपये नोकरीची ऑर्डर मिळाल्यानंतर देण्याचा करारनामा १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर केला. त्यानुसार कुलकर्णी दांंम्पत्याने काटे हिस २० लाख रुपये रोख दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. उस्मानपुरा पोलिस या प्रकरणात तपास करीत असून, कायदेशीर बाबी तपासून आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी दिली. अधिक तपास निरीक्षक गिता बागवडे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ करीत आहेत.
उद्योगमंत्र्यांकडून कारवाईचे आदेशउद्योगमंत्री उदय सामंत यांना त्यांच्या नावाने कोणीतरी महिला पैसे उकळत असल्याची माहिती मंगळवारी नागपूर येथील विधिमंळात झाली. त्यानुसार त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुरेखा काटेच्या विरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार अशोक रसाळ यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार तक्रार नोंदवली.