लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यातील १८ धर्मादाय न्यास रुग्णालयांत उद्या ३ डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.धर्मादाय सहआयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली धर्मादाय न्यास रुग्णालयांत एकाच वेळी आरोग्य तपासणी शिबीर घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांनी सांगितले की, राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या आवाहनानुसार संपूर्ण राज्यातील धर्मादाय रुग्णालयांत सकाळी १० वाजेपासून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. याअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील १८ धर्मादाय रुग्णालयांत आरोग्य तपासणीची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. या शिबिरात कोणालाही मोफत आरोग्य तपासणी करून घेता येणार आहे. ज्या धर्मादाय रुग्णालयात जी व्यवस्था आहे त्यानुसार तपासणी केली जाईल. धर्मादाय न्यास रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर (ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५० हजारांच्या आत आहे.) त्यांना मोफत तसेच दुर्बल घटकांतील रुग्णांवर (ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाखच्या आत आहे) त्यांच्यावर सवलतीच्या दरात उपचार केले जातात व याची नोंद धर्मादाय सहआयुक्तालयात असते. या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन भोसले यांनी केले. यावेळी उपआयुक्त विवेक सोनुने यांच्यासह सहायक आयुक्तांची उपस्थिती होती.
धर्मादाय रुग्णालयात आज मोफत आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 1:33 AM