फेसबुकवरील मैत्री घातक ठरली; विवाहितेवर अत्याचारकरून ब्लॅकमेल करणाऱ्या मालेगावच्या तरुणावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 12:28 PM2021-03-09T12:28:00+5:302021-03-09T12:31:06+5:30
Rape and Blackmailing case प्रतीक उर्फ रिक्की पाटील (रा. मालेगाव, जि. नाशिक) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
औरंगाबाद: फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणाने विवाहितेशी ओळख वाढवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली. अत्याचारी तरुण तिला सतत भेटायला येण्यासाठी बोलवत असे, तिने नकार दिल्यावर त्याने तिच्या नातेवाईकांना मेसेज पाठवून बदनामी सुरू केली. पीडितेने त्याच्या या त्रासाला कंटाळून पोलिसांत धाव घेतली.
प्रतीक उर्फ रिक्की पाटील (रा. मालेगाव, जि. नाशिक) असे संशयित आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, आरोपीने ९ जुलै २०१९ रोजी फेसबुकवर पीडितेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. पीडितेचे माहेर असलेल्या मालेगावचा तो रहिवासी असल्याने तीने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. तेव्हापासून तो पीडितेच्या संपर्कात होता. फेसबुक मेसेंजरच्या चॅट बॉक्समधून मेसेज पाठवून त्याने तिच्याशी जवळीक निर्माण केली. माहेरचा असल्यामुळे पीडिता त्याच्यासोबत सुख दु:खाच्या भावना व्यक्त करी. याचाच गैरफायदा घेत तो तिला भेटायला औरंगाबाद शहरातील तिच्या घरी गेला. पीडिता घरात एकटीच असल्याची संधी साधून त्याने तिच्यावर बळजबरी करीत अत्याचार केला.
२०१९ ते ६ मार्च २०२१ या कालावधीत त्याने तिच्यावर अशाच प्रकारे चार वेळा अत्याचार केला. लॉकडाऊन कालावधीतही तो तिला भेटण्यासाठी घराबाहेर बोलावू लागला. कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे आता आपल्याला भेटता येणार नाही, असे तिने त्याला अनेकदा बजावले. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे तो तिला सतत कॉल करून आणि मेसेज पाठवून भेटण्यासाठी आग्रह करी. पीडितेने नकार दिल्यावर त्याने तिच्या पती आणि अन्य नातेवाईकांना मेसेज पाठवून तिची बदनामी करण्यास सुरुवात केली. त्रास असह्य झाल्यावर तिने ७ मार्च रोजी एमआयडीसी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली.