फुलंब्रीत नगर पंचायत निवडणुकीत चढला ज्वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:38 AM2017-12-03T01:38:53+5:302017-12-03T01:38:58+5:30
फुलंब्री येथील नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून मतदानाला दहा दिवस उरले असताना नगराध्यक्षासह सर्वच नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
फुलंब्री : येथील नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून मतदानाला दहा दिवस उरले असताना नगराध्यक्षासह सर्वच नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या निवडणुकीत आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांना प्राधान्य देण्यात आल्याने हे उमेदवार मतदान ‘पक्के’ करण्यासाठी नवीन युक्त्या शोधत आहेत.
१३ डिसेंबर रोजी मतदान होणार असून या निवडणुकीत दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. एकीकडे भाजपने स्वतंत्र पॅनल उभे केले तर दुसरीकडे त्यांना मात देण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन शहर विकास आघाडी तयार केली. गेल्या पंधरा वर्षात शहराचा विकास थांबलेला असल्याने तिन्ही पक्षाला एकत्र येणे आवश्यक झाले असल्याचा सूर नागरिकांमधून निघत आहे.
प्रचाराला केवळ नऊ दिवसाचा कालावधी राहिल्याने प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने कामाला लागला आहे. मतदान होईपर्यंत वार्ड सोडायचा नाही, अशा प्रकारचा चंग त्यांनी बांधला आहे. दोन्ही पॅनलकडून उमेदवारांची निवड करताना चाचपणी करण्यात आली.
यात आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्राधान्य देण्यात आले. मोजके पाच ते सहा उमेदवार सोडले तर बाकीचे सर्वच उमेदवार ‘धनको’ आहेत. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार रंगला नाही तर नवलच म्हणावे लागेल.
भोंग्याचा आवाजाने नागरिक त्रस्त
या निवडणुकीत दोन उमेदवार नगराध्यक्षपदासाठी व ४५ उमेदवार नगरसेवकपदासाठी रिंगणात आहेत. प्रत्येक जण प्रत्येक वार्डात चारचाकी वाहनावर लाऊडस्पीकर लावून प्रचार करीत आहे.
कर्कश आवाजाने नागरिक त्रस्त झाले आहेत. लाऊडस्पीकरचा आवाज कमी ठेवावा, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.
इव्हीएम मशीनबाबत वावड्या
गेल्या अनेक निवडणुकीत मतदान एकाला करताना ते दुसºयाला पडले, अशा प्रकारच्या बातम्या टीव्हीवर बघायला मिळतात. त्यामुळे या निवडणुकीत असे होते की काय, अशा प्रकारच्या वावड्या उठत आहेत. याबाबत हॉटेलवर चर्चा होताना दिसत आहे.