'दिल्लीच्या गडकरी राया, खासदार जलीलभैया गोंधळाला या...या...'; वाहतूक समस्यांवर ग्रामस्थांचा जागरण-गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 08:03 PM2021-11-01T20:03:32+5:302021-11-01T20:04:49+5:30
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव-औट्रमघाटात दरड कोसळल्याने दोन महिन्यांपासून जड वाहतुकीसाठी घाट बंद आहे.
कन्नड : एरव्ही देवादिकांना जागरण गोंधळाच्या माध्यमातून साकडे घालून धावून येण्याचे आवाहन केले जाते. मात्र, कन्नडमधील औट्रम घाटात ‘दिल्लीच्या गडकरी राया, जागरणाला या या, खासदार जलीलभैया गोंधळाला या या’ असे स्वर आळवून विविध मागण्यांसाठी चक्क लोकप्रतिनिधींना येथे येऊन समस्या सोडविण्याचे आवाहन करण्यात आले. राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानच्या वतीने आज करण्यात आलेल्या या अनोख्या जागरण गोंधळ आंदोलनाची चर्चा तालुक्यात दिवसभर होत होती.
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव-औट्रमघाटात दरड कोसळल्याने दोन महिन्यांपासून जड वाहतुकीसाठी घाट बंद आहे. हा रस्ता सुरू करावा, भुयारी मार्ग पूर्ण करावा, तालुक्यातील जनतेकडून टोल वसुली थांबवावी या मागण्यांसाठी घाटात राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानकडून जागरण-गोंधळ-सत्यनारायण असे गांधीगिरी आंदोलन सोमवारी करण्यात आले. आंदोलनात सकाळी सत्यनारायण पूजा करून नंतर वाघे मंडळाचा जागरणाचा कार्यक्रम रंगला. यावेळी केंद्रीय रस्ते व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवतजी कराड, खा. इम्तियाज जलील यांना गाण्याच्या माध्यमातून जागरणाला येण्याचे साकडे घालण्यात आले. प्रास्ताविक राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सीताराम जाधव यांनी केले. डॉ. प्रशांत अवसोरमल, राजानंद सुरडकर यांची यावेळी भाषणे झाली.
या मागण्यांसाठी केले आंदोलन
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर आजपर्यंत पाच हजार कोटी खर्च होऊन गेला आहे. मात्र, घाटातील ८ कि.मी. भुयारी रस्ता झाला नाही. तेलवाडीच्या पुढे हे काम थांबविण्यात आले. त्यातच अतिवृष्टीमुळे जुन्या घाट रस्त्यावर दरड कोसळून दोन महिन्यांपासून हा रस्ता जड वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे ही वाहतूक शिऊर बंगला, नांदगाव मार्गे वळवावी लागली. ८ कि.मी. रस्त्याअभावी १२० कि.मी.चा फेरा मारावा लागत असून वेळ, इंधन खर्च वाढला आहे. जनतेकडून करण्यात येणारी टोल वसुली थांबवावी, कामात कुचराई करणाऱ्या रस्त्याच्या गुत्तेदारांवर वन अधिनियमान्वये गुन्हे नोंदवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.