वाळूज महानगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वाळूज महानगरात रविवारी विविध जयंती उत्सव समितीतर्फे मिरवणूक काढून उत्साहात साजरी करण्यात आली. मिरवणुकीत डीजेच्या तालावर तरुणाई बेभान होऊन थिरकत होती. मिरवणुकीत एकच गाजावाजा भिमराव एकच राजा या गाण्याचा बोलबाला होता. यावेळी आंबेडकरी अनुयायाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जय भीम आदी गगनभेदी घोषणांनी उद्योगनगरी दणाणून गेली होती. मिरवणुका पाहण्यासाठी गर्दी झाल्यामुळे मुख्य रस्ते गर्दीने फुलून गेले होते.
वाळूज महानगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बजाजनगर, रांजणगाव, सिडको, जोगेश्वरी, वाळूज, घाणेगाव, साजापूर, करोडी आदी भागात जयंती उत्सव समितीतर्फे बाबासाहेबांच्या प्रतिमेची तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेब यांच्या पुतळ्याची डीजेच्या दणदणाटात भव्य मिरवणूक काढण्यात आली. बजाजनगर येथे आम्रपाली बुद्ध विहारातर्फे सजवलेल्या रथात भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत विद्यार्थ्यांचे लझिम पथक आकर्षणाचे केंद्र ठरले. इंद्रप्रस्थ कॉलनी, सारा सार्थक हौ. सोसायटी, सिडको वाळूज महानगर, वडगाव कोल्हाटी येथे काढलेल्या मिरवणुकीचा आम्रपाली बुद्ध विहार येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ समरोप करण्यात आला. मिरवणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. शांततेला गालबोट लागू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.महापुरुषांच्या नावाचा जयघोषमिरवणुकीत जय भीम... जय भीम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाच्या गगनभेदी जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता.