Gandhi Jayanti Special : चंपावतीनगरीच्या चौकीदार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 11:41 AM2018-10-02T11:41:58+5:302018-10-02T11:42:43+5:30
महात्मा गांधी जयंती विशेष : गांधीजींच्या तीन माकडांची मराठवाडा सैर.... पुरुषप्रधान संस्कृती असली तर या नगरीवर आतापर्यंत केशरकाकू क्षीरसागर, विमल मुंदडा, रजनीताई पाटील, खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. संगीता ठोंबरे, जि.प. अध्यक्षा सविता गोल्हारपासून ते ग्रामविकासमंत्री पंकजा मुंंडे यांच्यापर्यंत सर्वच महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने आपल्या कर्तृत्वाची छाप टाकली.
- सतीश जोशी
बापूंच्या तीन भावंडांमधला ‘बुरो मत सुनो’वाला मी. बापूंच्याच आदेशानुसार बीड अशी ओळख असलेली चंपावतीनगरी मी गाठली. इथे नेहमीच राजकीय भूकंप होत असतात. कधी परळी तर कधी आष्टी हा या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू असतो. अधूनमधून बीडमधून धक्के देऊन ताकद दाखवली जाते. मी परळीमागे जिल्ह्यात प्रवेश मिळवला. वैद्यनाथाचे दर्शन घेतले. अनाहूत पाहुणा पाहून आपल्यात वाटेकरी वाढला, अशी भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब आपल्यात नाहीत, याचे दु:ख भक्तांच्या चर्चेत होते. भगवानगडाबद्दल जो आज वाद निर्माण केला जात आहे, याचीही खंत त्यांना बोचत होती. बापूंच्या आदेशानुसार मी शांतपणे ऐकत होतो. मध्येच कुणीतरी परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाचा विषय काढला. घोषणेप्रमाणे २०१९ पर्यंत हा मार्ग सुरू होणार नाही, यावर एकमत झाले. ताईच्या समर्थकाला हे आवडले नाही. त्याने लगेच जगमित्र नागा सूतगिरणीचा विषय काढला आणि दोघेही गप्प झाले.
मुंडेसाहेबांप्रमाणे पंकजाताई संपर्क ठेवत नाहीत, असे कोणीतरी बोलले. गळ्यात शबनम असलेल्या पत्रकाराने मध्येच तोंड घातले. अहो, तुमचे सोडून द्या, आम्हा पेपरवाल्यांशीही त्यांचा महिनोमहिने संपर्क होत नाही. मध्येच दुसऱ्याने शर्टाच्या बाह्या वर करीत ‘आमच्या खासदार डॉ. प्रीतमतार्इंबदल बोलाना’ असे आव्हान दिले. हो बाबा खरे आहे, असे म्हणत तिसऱ्याने प्रीतमतार्इंप्रमाणे पंकजातार्इंना आपण मनमोकळेपणाने बोलतोत का, असा सवाल केला.वाद हातघाईवर येत असल्याचे लक्षात येताच मी तिथून अंबाजोगाई जवळ केली आणि थेट अंबा योगेश्वरीचे दर्शन घेतले. इथेही राजकीयच गप्पा होत्या. कुणीतरी म्हणाले, माजी मंत्री डॉ. विमल मुंदडा यांचा हा बालेकिल्ला. दांडगा जनसंपर्क आणि विकासकामांच्या जोरावर त्यांनी एकछत्री अंमल केला. त्यांच्या निधनानंतर भाजपच्या डॉ. संगीता ठोंबरे या नव्या चेहऱ्याने निवडणूक जिंकलीच नाही तर मुंदडांच्या कार्यपद्धतीवर वाटचाल सुरू आहे. त्यांनी आणखी संपर्क वाढवायला पाहिजे, असाही कुणीतरी सल्ला देऊन टाकला. बीड जवळ करायचे असल्यामुळे तिथून सटकलो.
बीड वळणरस्ता आणि बिंदुसरा नदीवरील पुलाच्या कामावरून इथे आ. विनायक मेटे आणि आ. जयदत्त क्षीरसागर यांच्यात श्रेयवादाची लढाई झाली, आरोप-प्रत्यारोपाचे बरेचसे पाणी या पुलाखालून वाहून गेले, असे कुणीतरी मला सांगितले होते. ३५ वर्षांपासून बीड पालिकेवर क्षीरसागरांचीच सत्ता. कौटुंबिक कलहात गेल्या एक वर्षाचा अपवाद सोडला तर पालिकेवर डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचेच राज्य. शहरात जिकडे-तिकडे साचलेल्या कचऱ्याचे ढीग दिसत होते. नाकावर हात ठेवूनच भटकत होतो. नाट्यगृहाजवळील मैदानात गर्दी दिसली. कानोसा घेतला तेव्हा कुणीतरी बारामतीचे मोठे पवारसाहेब आल्याचे सांगत होते. जयदत्त अण्णाने जिल्ह्यातीलच काय बारामतीच्या धाकट्या दादासाहेबांनाही जुमानले नाही. साहेबांनी दोन दिवस अगोदर नाशिकच्या छगन भुजबळांना पाठवून अण्णांची समजूत काढली. एकमेकांची समजूत काढण्यात हे दोघेही निष्णात आहेत, याचे अनुभव पवारसाहेबांना अनेक आले, असं कुणीतरी म्हणालं.
सर्वकाही ओके झाल्यावर पवार साहेब आले. रुसलेले अण्णाही हसले. आधी अण्णा दीड वर्षापासून पक्षापासून दूर आहेत, अशी कागाळी करणारी मंडळी अण्णा पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय झाल्यामुळे कसे परेशान झालेत, याचे विश्लेषण कानावर पडत होते. पुतण्या संदीपचे काय होणार? अशी चिंताही कुणीतरी व्यक्त केली. या राजकीय गप्पांचा आता कंटाळा आला होता. पुन्हा कानावर हात ठेवून बापूंना मनातल्या मनात अभिवादन केले आणि परतीचा प्रवास सुरू केला.
मर्जीतल्या लोकांची गुत्तेदारी
साठेचौकातून सुभाष रोडमार्गे जात असताना एके ठिकाणी गर्दी दिसली. कानोसा घेतला तर कुणीतरी घसरून पडले असे सांगत होता. असे प्रकार नेहमीच घडतात, अशी कुणीतरी पुष्टी जोडली. मर्जीतल्या गुत्तेदाराने हे काम किती निकृष्ट केले. पेव्हर ब्लॉक दोन महिन्यातच खराब झाल्यामुळे दररोज अपघात होत आहेत, असंही कुणीतरी रागानं ओरडलं.
(लेखक हे ‘लोकमत’चे बीड जिल्हा प्रतिनिधी आहेत.)