Gandhi Jayanti Special : लढाऊ पर्भनीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 11:25 AM2018-10-02T11:25:20+5:302018-10-02T11:26:17+5:30

महात्मा गांधी जयंती विशेष : गांधीजींच्या तीन माकडांची मराठवाडा सैर... गंगाखेड म्हंजे संत जनाबाईचं गाव. जिला सोता पांडुरंग दर्शन देत होता. तुमी यष्टीत बसून पर्भनीहून गंगाखेडला जा, नाही पांडुरंग आठवला तर ह्यो पठ्ठ्या नाव सांगनार न्हाई. आपन बोल्लो न्हाई कुनाशी कारण का तर आपण म्हंजे ‘बुरा मत सुनोवालं’ माकड. आसना का माकड पन लै इच्यार करतो आपन. ह्यो रस्ता गवरमेंटनं असा कावून ठिवला आसन याच्यावर इच्यार केला. जनाबार्इंनी रचलेत अंदाजे साडेतीनशे आभंग. तेव्हढे आठवून झाले तरच गाडी गंगाखेडला पोहोंचली पायजे, असा त्येंचा इचार आसन, आसं आपल्याला वाटलं.

Gandhi Jayanti Special: Fighter Parabhnikars | Gandhi Jayanti Special : लढाऊ पर्भनीकर

Gandhi Jayanti Special : लढाऊ पर्भनीकर

googlenewsNext

- आनंद देशपांडे 

जशी का वरून आॅर्डर आली की, ब्वा ‘पर्भनीची परिस्थिती कशी काय हाये, त्ये बघूनशान आर्जंट रिपोर्ट द्या’ तस्सा निघालो आन आकाशमार्गे यात्रा सुरू केली. बापू, हौ ना राजेहो, बापू म्हंजे महात्मा गांधी, त्यांची आॅर्डर आमाला फायनल आस्ती. आता तुमी मंचाल ‘तुम्ही कोन?’ आन ‘असली कोन्ती भाषा बोलायलेत’ म्हनून. त्याचं उत्तर आधी देतो. तर आपन म्हंजे गांधीजींच्या तीन माकडायपैकी येक म्हंजे ‘बुरा मत सुनोवालं’ माकड आपनच हैत. आन ही भाषा कोंची म्हंचाल तर ही खासम खास पर्भनीची भाषा है. आपन फकस्त चोवीस तास हितं रहायलो आन जिंदगीभरासाठी आपली भाषा बदलून गेली. बोलनं हे आसं आघळ पघळ झालं आन जिंदगीत म्हणजे तुम्हा शेहरी लोकायच्या भाषेत सांगायचं म्हंजे ‘आयुक्शात’ निवांतपना आला. 

म्या पर्भनीवरून दोन-तीन चकरा मारल्या. ड्रोन क्यामेरा फिरतो तशे डोळे फिरवून हवाई पाहाणी केली. जगात जर्मनी बरुबर ज्याची रेस है ते गाव म्हंजे ह्येच. ज्याच्या चारी बाजूला शंभर किलोमीटरपर्यंत एकबी रस्ता धड न्हाई. पर्भनी-गंगाखेड रस्ता घ्या. गंगाखेड म्हंजे संत जनाबाईचं गाव. जिला सोता पांडुरंग दर्शन देत होता. तुमी यष्टीत बसून पर्भनीहून गंगाखेडला जा, नाही पांडुरंग आठवला तर ह्यो पठ्ठ्या नाव सांगनार न्हाई. योक डाव भवसागर पार करनं सोपं है पन पर्भनीहून गंगाखेड गाठनं, लै म्हणजे लैच अवघड है.

तिथून आलो पर्भनी शिटीत. समदे लोकं रस्त्यानं चलताना उड्या मारीत चलत होते. समद्या गाड्या, म्हंजे फटफट्या, स्कुटरी, कारी, सायकिली त्याबी टनाटन उड्या मारीत पळत होत्या. म्या इचार केला, म्हनलं गाड्यायला स्प्रिंगा बसविल्या आस्तीन, पन पर्भनीच्या मान्सायच्या पाठीच्या मनक्यातबी स्प्रिंगा बस्विल्यात का काय की हौ, इथल्या लोकायचा काही भरोसा न्हाई. एटीयम फोडायसाठी रातच्याला जेशिबी घिवून जानारी बहाद्दर मानसं हैत हितं. पन नीट नजर टाकली तवा ध्येनात आलं की, ब्वा हितले रस्तेच अशे हैत का गाडी आसू का गडीमानुस असू, कसंबी चाललं तर त्येला उड्या मारीतच जावं लागतंय. रस्त्यावर नजर टाकली तर आक्ख्या शिटीत मिळून तिनेक हजार जनावरं चोवीस तास रोडच्या दोन्ही साईडला निवांत बसून हुती.

ट्रक येवू का बस येवू एकबी जनावर ढिम्म हालत नव्हतं. राँग सैडनी दोनचाकी गाडी चलवायची, बसलेल्या गुरायला कटा हानीत वाट काढायची, राईट साईडीनं आलेल्या मान्साकडं रागानं बघायचं, मागं बसलेली बायकू भनभन करिती तिच्यासंग सवाल जवाब करायचे, दोघात बसलेलं लेकरू किरकिरी आन पेट्रोल टाकीवर बसलेलं पिरीपिरी चालू ठेवितात, त्याह्यला गप करून गाडी दामटायची म्हणजे खायाचं काम है का राजेहो? हे जर्मनीच्या जर्मन लोकायला कवाच जमनार न्हाई ते पर्भनीकर गडी इज्झी करतो़ म्हंजे मोठ्या मान्सायचं गाव है का न्हाई तुमीच सांगा. कुन्या जमान्यात निजामाशी पंगा घ्यून त्याला वाटेला लावनारे पर्भनीकर अजुकबी लढाई करीत हायेत असा रिपोर्ट देनार है. देनार म्हंजे देनारचं! तुमाला तर म्हाईत है, मंग माझा सोभाव कसा है ते.

राँग सैड तरिबी लाईफ एन्जॉय 
समद्या गावभर धुळीचा ह्ये खकाना. बरं करता बरं हितं इमानतळ न्हाई, नायतर इमानाला दिवसाबी सापडलं नसतं की गाव कुठशीक है म्हनून. रस्त्यायचे अशे हाल हैत म्हन्ताना मला वाटलं लोकं लै बेजार आस्तेन; पण छ्या, समदे मजेत होते. राँग सैडीनी गाडी चलवून लाईफ एन्जॉयबी करत होते. 

(लेखक हे परभणीतील साहित्यिक आहेत.)

Web Title: Gandhi Jayanti Special: Fighter Parabhnikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.