Gandhi Jayanti Special : कचरा डेपोने लातूरकर हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 11:49 AM2018-10-02T11:49:03+5:302018-10-02T11:50:01+5:30
महात्मा गांधी जयंती विशेष : गांधीजींच्या तीन माकडांची मराठवाडा सैर.... ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महिन्याला मनपाला कोटींचा खर्च होतोय. तरीपण हजार क्यूबिक मीटरचा कचऱ्याचा ढीग शहरानजीक वरवंटीच्या डेपोवर साचला आहे. यामुळे परिसरातील जनता हैराण आहे. हे कोणालाच कसे दिसत नाही बापू?
- हणमंत गायकवाड
पापाची वासना
नको दावू डोळा ।
त्याहुनि आंधळा बराच मी ।।
निंदेचे श्रवण नको माझ्या कानी ।
बधिर करोनी ठेवी देवा ।।
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा ।
त्याहुनि मुका बराच मी ।।
संत तुकारामांनी रचलेल्या या अभंगाची प्रचीती लातूर शहरातून वावरताना दिसून येत आहे. शहरासह जिल्ह्यात ‘कल्याण-मुंबई’ जोरात आहे. आकड्यांचा हा आजार काही काळ शहरातून गायब होता. तो आता खेड्यापर्यंत पोहोचला; पण हे कोणालाच कसे दिसत नाही? बापूंनी सांगितले म्हणून मी इथे आलो. ‘बुरा मत देखो’ हा माझा वसा. बापूंच्या आदेशाने एक दिवसासाठी मी डोळे उघडले; पण हे काय पाहतोय मी?
शिक्षण क्षेत्राचा लातूर पॅटर्न या शहराने राज्याला दिला. जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे बापू. खून पाडले जाताहेत. एकाच खोलीत हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारे द्रोणाचार्य येथेच आहेत. पाच हजारांपासून पन्नास हजारांपर्यंत शुल्क आहे त्याचे. अकरावी, बारावीच्या शिकवणी वर्गाचा खर्च लाखोंवर गेला आहे. हा शिक्षणाचा बाजार नाही तर आणखी काय आहे बापू? आश्चर्य म्हणजे पालकांनाही याचे काहीच वाटत नाही बापू. वाळूचे दर ५० हजारांपर्यंत गेले आहेत. इथेही टक्केवारी आहे; पण आम्ही ठरवलंय वाईट बघायचंच नाही. ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महिन्याला मनपाला कोटींचा खर्च होतोय. तरीपण हजार क्यूबिक मीटरचा कचऱ्याचा ढीग शहरानजीक वरवंटीच्या डेपोवर साचला आहे. यामुळे परिसरातील जनता हैराण आहे. त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आठवड्यातून दोनदा पाणी देऊ म्हणणारे, आता दहा दिवसाला पाणी देत आहेत. आता तर धरणात पाणीच नाही. बचतीकडेही लक्ष नाही. रेल्वेने पाणी आणण्याचे संकट आमच्यावर येऊ नये असे जनतेला वाटते; पण आम्ही काय करणार, आमच्या डोळ्याला पट्टी आहे.
छत्रपती शाहू महाराजांचा अर्धाकृती पुतळा शाहू चौकातून मनपाने सुशोभीकरणाच्या नावाखाली हलविला आहे. त्याला जवळपास दोन-चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला. उघडा चबुतरा सुशोभीकरणाची वाट पाहत आहे. समतेची दृष्टी देणाऱ्या राजा छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याची ही अवस्था आहे. आम्हाला सत्तेची खुर्ची दिसते; पण समतेची दृष्टी दिसत नाही. कारण आमच्या डोळ्यावर काळी पट्टी आहे.
कोणालाच कसे काही वाटत नाही?
चौका-चौकांनी बॅनर आहेतच. रस्त्यांवर खड्डे, डासोत्पत्ती आणि डेंग्यूच्या उपद्रवामुळे लोक हैराण आहेत. ना धूरफवारणी ना उपाययोजना. जनजागृतीचाही अभाव. हे ना प्रशासनाला दिसते ना राज्यकर्त्यांना. सर्वसामान्यांनाही कसे काही वाटत नाही.
(लेखक हे ‘लोकमत’च्या लातूर जिल्हा कार्यालयात उपसंपादक आहेत.)