देशी दारू दुकान हटविण्यासाठी गंगाखेडच्या महिला सरसावल्या
By Admin | Published: June 21, 2017 11:36 PM2017-06-21T23:36:50+5:302017-06-21T23:43:12+5:30
गंगाखेड : शहरातील महेबूबनगर परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेले देशी दारूचे दुकान तत्काळ इतरत्र हलवावे, या मागणीसाठी महिलांनी एकत्र येऊन तहसीलदारांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : शहरातील महेबूबनगर परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेले देशी दारूचे दुकान तत्काळ इतरत्र हलवावे, या मागणीसाठी महिलांनी एकत्र येऊन तहसीलदारांना निवेदन दिले. यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे.
न्यायालयाने रस्त्याच्या कडेला असलेली दारूची दुकाने बंद केल्याने या दुकानदारांनी वस्तीच्या ठिकाणी आपली दुकाने हलविली आहेत. महेबूबनगर, नांदेडरोड परिसरात दत्त मंदिर व इतर धार्मिक स्थळे असल्याने या ठिकाणी शहरातील महिला विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी याच रस्त्याने ये-जा करतात. यामध्ये दारू दुकानातून दारू पिऊन रस्त्यावर अश्लील भाषेत दारूडे शिवीगाळ करून धिंगाणा घालतात. यामुळे महिला व भाविक भक्तांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे २१ जून रोजी महेबूबनगरातील महिलांनी एकत्र येत तहसीलदारांचे कार्यालय गाठून नायब तहसीलदार काळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दारू दुकान हटविण्याची मागणी केली. या निवेदनावर लक्ष्मीताई आढे, कांताबाई कुऱ्हे, शेख सलिमा, सुमन कांबळे, शेख दौलतबी, मनिषा कांबळे, शेख सानूबी, सय्यद शबाना आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.