मंदिरावरील देवळीतील गणपती दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:04 AM2021-09-13T04:04:18+5:302021-09-13T04:04:18+5:30
औरंगाबाद : शहरातील महादेवाच्या प्राचीन मंदिरावर असलेल्या देवळीमध्ये गणपतीची मूर्ती आपण पाहिलीच असेल. मात्र, देवळीतील बाप्पा तसे पाहिले ...
औरंगाबाद : शहरातील महादेवाच्या प्राचीन मंदिरावर असलेल्या देवळीमध्ये गणपतीची मूर्ती आपण पाहिलीच असेल. मात्र, देवळीतील बाप्पा तसे पाहिले तर दुर्लक्षितच असतात. अलीकडे देवळीतील मूर्तीला शेंदूर लेपून त्याचे मूळ रूप बदलून गेल्याचे दिसून येत आहे.
गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. भक्तांसाठी मंदिरे बंद आहेत. मात्र, नित्यनियमित पूजा, आरती केली जात आहे. अनेक मंदिरे असेही आहेत की, मंदिरावरील प्रथमदर्शनी छोट्याशा देवळीत गणपती बाप्पा विराजमान आहेत. यातील काही मूर्तीवर आकर्षक नक्षीकाम करण्यात आले आहे, तर काही मंदिरातील देवळीची वास्तुरचनाही लक्ष वेधून घेते. यातील सर्वात सुंदर देवळी म्हणजे सातारा गावातील खंडोबाच्या मंदिरात आहे. या हेमाडपंती मंदिराच्या दर्शनी भागात दक्षिण बाजूस एक छोटीशी पण लक्षवेधी देवळी आहे. काळ्या पाषाणातील या देवळीचे नक्षीकामही तेवढेच सुंदर आहे. यात गणपतीच्या छोटीशा मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. अनेकांचे लक्षही त्या देवळीकडे जात नाही. काही भाविक या देवळीतील गणपतीचे दर्शन घेतात व नंतर खंडोबाच्या दर्शनाला जातात. अशीच देवळी सातारा परिसरातील कार्येश्वर महोदव मंदिराबाहेर बघण्यास मिळते. येथे गणपतीची शेंदूरवर्णीय मूर्ती आहे. पहिले गणरायाचे दर्शन घेऊन मग भाविक कार्येश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी देवळात प्रवेश करतात.
नवीन बांधकाम केलेल्या मंदिरामध्ये अशा देवळ्या फार कमी दिसतात. पण, हेमाडपंती बांधकाम असलेल्या तेही महादेवाच्या मंदिराबाहेर अशा देवळ्या हमखास आढळून येतात. ज्यात गणपती, हनुमान यांच्या मूर्ती ठेवण्यात आलेल्या दिसतात.
चौकट
दरवाजावर गणराया
कोणतेही मंगल कार्य करण्यापूर्वी गणरायाची पूजा केली जाते. लग्नपत्रिकेवरही पहिले गणपती व नंतर कुलदेवतेचे छायाचित्र छापले जाते. एवढेच नव्हे, तर घरातील मुख्य दरवाजावर गणपतीची प्रतिमा लावण्यात येते. मंदिरात प्रवेश करताना आपणास दरवाजावर गणपतीची मूर्ती हमखास दिसते. मंदिरात जाताना अनेक भाविक पहिले दरवाजावरील गणेशाचे दर्शन घेतात व मगच मंदिरात प्रवेश करतात.
कॅप्शन
सातारा परिसरातील खंडोबा मंदिराच्या दर्शनी बाजूस आकर्षक देवळीत बसविण्यात आलेली गणपतीची देखणी मूर्ती.
----
सातारातील कार्येश्वर महादेव मंदिरात दर्शनी बाजूस देवळीतील गणेशमूर्ती.