चिंचोली लिंबाजी येथे गॅसच्या टाकीचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:28 AM2018-04-04T00:28:42+5:302018-04-04T15:25:25+5:30
कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील चांभारवाडी परिसरात स्फोट होऊन लागलेल्या आगीत एका घराची राखरांगोळी झाली. स्फोट एवढा भीषण होता की, घरावरील पत्रे व घरातील साहित्याचा अक्षरश: चुराडा झाला. ग्रामस्थांनी वेळीच आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
घराची राखरांगोळी : आगीत अडीच लाखांचे नुकसान
चिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील चांभारवाडी परिसरात स्फोट होऊन लागलेल्या आगीत एका घराची राखरांगोळी झाली. स्फोट एवढा भीषण होता की, घरावरील पत्रे व घरातील साहित्याचा अक्षरश: चुराडा झाला. ग्रामस्थांनी वेळीच आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
या स्फोटात अडीच लाखांचे नुकसान झाले असून सदरील कुटुंब उघड्यावर आले आहे. हा स्फोट नेमका कशाचा झाला याचे कारण अस्पष्ट असले तरी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची टाकी फुटलेली आढळून आल्याने हा स्फोट गॅस गळतीमुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
चिंचोली लिंबाजी येथील जिल्हा परिषद शाळेला लागून असलेल्या चांभारवाडी परिसरात आसाराम धनाजी बरथरे हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यांच्या पत्नी सुंदरबाई बरथरे यांनी चहा करण्यासाठी गॅस सुरु केला. गॅस सुरु करताच आग लागून मोठा जाळ झाला. आग लागताच त्यांनी त्यांच्या कुटुंबाने घराबाहेर धाव घेतली. ते बाहेर पडताच काही क्षणातच गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. ते वेळीच बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता, असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.
हा स्फोट एवढा भीषण होता की, स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचा परिसर हादरून गेला. त्यामुळे काहीकाळ एकच गोंधळ उडाला. शक्तिशाली स्फोटामुळे घरावरील पत्रे व घरातील साहित्य अस्तव्यस्त अवस्थेत दूरवर फेकल्या गेले. गॅस सिलिंडरच्या टाकीचा अक्षरश: चुराडा झाला. स्फोट झाल्याने घराला आग लागली. काही क्षणातच घरातील सर्व साहित्य भस्मसात झाले. आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वेळीच आग विझवली. त्यामुळे या घराला लागून असलेली इतर घरे आगीपासून बचावली. बरथरे यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून त्यांनी रात्रंदिवस मोलमजुरी करून कमावलेले ६० हजार रुपये, तसेच कपडे, भांडी, धान्य, शिलाई मशीन इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. दिवसरात्र एक करून कष्टाने उभा केलेला संसार एका क्षणात भस्मसात झाल्याचे पाहून या कुटुंबाने एकच हंबरडा फोडून आक्रोश केला. यामुळे आजूबाजूच्या लोकांनाही गहिवरून आले. घटनास्थळी ५०० व २००० हजार रुपयांच्या जळालेल्या नोटा आढळून आल्या.
घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी जी. टी. आवळे, तलाठी बी.बी जंगले यांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानीचा पंचनामा केला. यात सदरील कुटुंबाचे जवळपास अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या स्फोटात लागलेल्या आगीमुळे आसाराम बरथरे यांचे कुटुंब बेघर झाले असून शासनाने या कुटुंबास तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
डिपीच्या स्पार्कींगमुळे शिरजापूर येथे आग
गोठा खाक : ३ लाख १७ हजारांचे नुकसान
चापानेर : येथून जवळच असलेल्या शिरजापूर येथे मंगळवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास गावालगत असलेल्या महाजन पुंजाबा हिवर्डे यांच्या गुरांच्या गोठ्यास शेजारी असलेल्या विद्युत डिपीच्या स्पार्कींगमुळे लागलेल्या भीषण आगीत तीन लाख सतरा हजारांचे नुकसान झाले. सुदैवाने गावकऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेने जीवितहानी झाली नाही. वेळीच अग्निशामक दलाची गाडी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली. घटनास्थळी तलाठी एम. आर. दरेकर, रमेश बोर्डे यांनी पंचनामा केला.
शिरजापूर येथे गट नंबर १० मध्ये महाजन पुंजाबा हिवर्डे यांचा गुरांचा गोठा असून अचानक शेजारी असलेल्या विद्युत डिपीच्या शॉट सर्किटमुळे ठिणगी उडून गोठ्यास आग लागली. दुपारचे ऊन व वारा असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. गावकºयांनी तत्परतेने गोठ्यातील जनावरे सोडून दिल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र गोठ्यातील टिनपत्रे, पाईप, ठिबक सिंचनचे साहित्य, बैलगाडी, सायकल, हरभरा, जनावरांचा चारा, शेणखत, शेती औजारे जळून खाक झाले. आगीत एकूण ३ लाख सतरा हजार दोनशे रुपयांचे नुकसान झाले आहे. गावात आठ दिवसांपासून ग्रामपंचायतचे पाणी नसल्यामुळे आग लवकर आटोक्यात येऊ शकली नाही. नंतर कन्नड येथील अग्निशामक दलाच्या गाडीने आग आटोक्यात आणली. गावातील बंडू राजपूत, गणेश पवार, देविदास पवार, ज्ञानेश्वर कदम, धोंडीराम ढगे, ओंकार घुसिंगे यांनी जिवाची पर्वा न करता जनावरे सोडल्याने जनावरे वाचली. जळीतग्रस्त शेतकरी व त्यांचे कुटुंब निराधार झाले असून, महावितरण कंपनीने व प्रशासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे.
करंजखेड येथे मकाच्या गंजीला आग
करंजखेड : करंजखेड येथील शेतकरी अण्णा पुंजाजी वाघ व दशरथ पुंजाजी वाघ यांच्या शेतातील जमा करुन ठेवलेल्या दोन एकरातील मकाच्या गंजीला २ एप्रिल रोजी दुपारच्या वेळी अचानक आग लागून एक लाख दहा हजार रुपयांचे नुकसान झाले.
शेजारी असलेले शेतकरी मदतीला धावले; पण उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे अण्णा वाघ यांची ६० तर दशरथ वाघ यांची ४० क्विंटल अशी शंभर क्विंटल मका जळून खाक झाली. मंडळ अधिकारी आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी राजेंद्र देशमुख यांनी तीन एप्रिल रोजी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस पाटील दिलीप वाघ यांनी घटनेची माहिती तहसीलला दिली.
घाटनांद्रा येथे मकाच्या गंजीस आग
घाटनांद्रा : येथील चारनेरवाडी शिवारातील गट क्र. ५९ मधील अडीच एकर जमिनीत लागवड केलेल्या मकाच्या गंजीस अचानक आग लागून शेतकºयांचे मोठे नुकसान झाले.
येथील बाबू शंकर चौधरी व सलीम देशमुख यांची चारनेरवाडी शिवारात शेत जमीन असून मका सोंगून त्याची गंजी मारून ठेवलेली होती. या ठिकाणी अचानक आग लागल्याने सलीम देशमुख यांची एक एकरामधील अंदाजे २५ ते ३० क्विंटल व बाबू चौधरी यांची दीड एकरामधील ३० ते ३५ क्विंटल मका जळून खाक झाली. दोन्ही शेतकºयांचे ५५ ते ६० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची तक्रार नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे. नुकसानभरपाई देण्याची मागणी उपसरपंच पुंडलिक पाटील मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष कचरू मोरे, बाबू चाऊस, मोहिज देशमुख आदींनी केली आहे. सदर घटनेचा पंचनामा तलाठी दांडगे यांनी केला.