औरंगाबाद जिल्ह्यातील माळेगावात गॅस्ट्रोची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:07 AM2018-06-28T00:07:49+5:302018-06-28T00:09:26+5:30

तालुक्यातील माळेगाव (पिंपरी) येथे दूषित पाणी पिण्यात आल्याने अनेक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने बुधवारी (दि.२७) गावात एकच खळबळ उडाली. येथील ११ रुग्णांपैकी एका महिलेचे प्रकृती बिघडल्याने तातडीने उपचारासाठी जळगावला दाखल करण्यात आले आहे.

Gastro infection in Malegaon in Aurangabad district | औरंगाबाद जिल्ह्यातील माळेगावात गॅस्ट्रोची लागण

औरंगाबाद जिल्ह्यातील माळेगावात गॅस्ट्रोची लागण

googlenewsNext
ठळक मुद्दे११ रुग्णांपैकी महिलेची प्रकृती गंभीर : गावात आरोग्य विभागाचे पथक दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
सोयगाव (जि. औरंगाबाद): तालुक्यातील माळेगाव (पिंपरी) येथे दूषित पाणी पिण्यात आल्याने अनेक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने बुधवारी (दि.२७) गावात एकच खळबळ उडाली. येथील ११ रुग्णांपैकी एका महिलेचे प्रकृती बिघडल्याने तातडीने उपचारासाठी जळगावला दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे पथक माळेगावात दाखल झाले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार दिवसांपासून माळेगाव (पिंपरी) येथील वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. यामुळे येथील ग्रामस्थांना शेतातील दूषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत होते. या दूषित पाण्याने व बदललेल्या वातावरणाने गावातील ११ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली.
येथील नागरिकांना उलट्या, मळमळ, जुलाब होत असल्यामुळे एकापाठोपाठ एक रुग्ण रुग्णालयात दाखल झाले.
यापैकी प्रकृती गंभीर झाल्यामुळे शेवंताबाई हरी सूर्यवंशी (८०) या महिलेला गंभीर अवस्थेत जळगावला हलविण्यात आले, तर इतर उर्वरित दहा जणांवर सोयगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या माळेगावात आरोग्याच्या सोयी उपलब्ध नाहीत. विशेष म्हणजे चार दिवसांपासून थकबाकीच्या नावाखाली या गावाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
त्यामुळे ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प झाल्याने ग्रामस्थांना शेतातील दूषित पाणी प्यावे लागले. यामुळे नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
येथील वीजपुरवठा त्वरित सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी अरुण सोनवणे, देवानंद जाधव, ग्रामपंचायत सदस्य अनिल जाधव, माजी सरपंच शिवराम जाधव, छोतूसिंग परदेशी आदींनी केली आहे. त्वरित दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा येथील गावकऱ्यांनी दिला आहे.
महावितरण विभागाला लेखी सूचना
माळेगावला वीजपुरवठा खंडित असल्याची माहिती नव्हती. दरम्यान, याप्रकरणी महावितरणच्या विभागाला लेखी सूचना देण्यात येतील. गावात गॅस्ट्रोचे रुग्ण आढळल्याची माहिती मिळाली असून, यासाठी आरोग्य पथकाला तैनात करण्यात आले आहे. संबंधित ग्रामसेवकाला परिस्थितीवर लक्ष ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे यांनी दिली.

Web Title: Gastro infection in Malegaon in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.