लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतील विविध शाळा, महाविद्यालयांतील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन शनिवारी (दि. २७) केले आहे. दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत स.भु. प्रशालेच्या प्रांगणात विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुनील देशपांडे, सचिव डॉ. नंदकुमार उकडगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.स. भु. संस्थेच्या कार्यालयात माजी विद्यार्थ्यांची संघटना दोन वर्षांपूर्वी स्थापन केली आहे. या संस्थेला दोन वर्षांपूर्वी १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. तेव्हा स्थापन केलेल्या या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेने आतापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सर्वांच्या सहकार्यांतून संस्थेला ४८ संगणकांची सुसज्ज कॉम्प्युटर लॅब देण्यात आली. यापुढेही संस्थेच्या विकासात भरीव योगदान देण्यासाठी देश-विदेशात विखुरलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या एकत्रीकरणाचा प्रयत्न करण्यात येत आहे. यातूनच २७ जानेवारी रोजी एकदिवसीय माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला आहे. यात त्यादिवशी १ वाजता मैदानावर सामूहिक प्रार्थना करण्यात येईल. यानंतर सर्व माजी विद्यार्थी रांगेत शिक्षकांसोबत वर्गात बसतील. या विद्यार्थ्यांना त्यांना शिकविलेल्या हयात असलेल्या शिक्षकांनाच शिकविण्यासाठी आमंत्रित केले असल्याचे डॉ. नंदकुमार उकडगावकर यांनी सांगितले. यानंतर रात्रीच्या ८ वाजेपर्यंत विविध कार्यक्रम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या संघटनेचे संचालक राम भोगले म्हणाले, आतापर्यंत माजी विद्यार्थी संघटना ४ ते ५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. यातील २६८ जणांनी प्रत्यक्ष नोंदणी केली. मेळाव्यापर्यंत मोठा प्रतिसाद मिळेल असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला संघटनेचे संचालक सुबाहू देवडा, सदस्य प्रमोद माने, डॉ. स्वाती दंडे, ज्ञानप्रकाश मोदाणी यांची उपस्थिती होती.
स. भु. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:21 AM