लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : छावणी परिसरातील गॅस्ट्रोची परिस्थिती अद्यापही कायम आहे. छावणी सामान्य रुग्णालयात गेला आठवडाभर गॅस्ट्रोच्या रुग्णांचा ओघ सुरू राहिला. त्यामुळे गॅस्ट्रो नियंत्रणात असल्याचा दावा फोल ठरत आहे.छावणी सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात आठवडाभरात गॅस्ट्रोच्या अनेक रुग्णांनी उपचार घेतले. जवळपास २० रुग्णांनी उपचार घेतले; परंतु हे सर्व रुग्ण जुनेच असून, एकही रुग्ण नवीन नसल्याचे छावणी सामान्य रुग्णालयाच्या आरएमओ डॉ. गीता मालू यांनी सांगितले. रुग्णांची संख्या अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.छावणी परिसरात ११ नोव्हेंबर रोजी २५० पेक्षा अधिक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे समोर आले. छावणी सामान्य रुग्णालयात तब्बल १२ दिवस गॅस्ट्रोचे रुग्ण दाखल होत होते. रुग्णांची संख्या अवघ्या काही दिवसांत सहा हजारांवर पोहोचली. त्यानंतर रुग्णांचा ओघ थांबला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले; परंतु गेल्या काही दिवसांत परिसरातील नागरिकांना अद्यापही गॅस्ट्रोचा त्रास होत असल्याचे दिसते.बाहेरचे पदार्थ टाळावेतरुग्णालयात येणारे सर्व रुग्ण जुनेच आहेत. नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळले पाहिजे. छावणी परिसरासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यास आज मंजुरी मिळाली आहे.-संजय गारोल, उपाध्यक्ष, छावणी परिषदगुन्हा दाखल कराएक महिना उलटूनही छावणी परिषदेने काहीही ठोस पाऊल उचललेले नाही. गॅस्ट्रोची परिस्थिती अजूनही सामान्य झालेली नाही. या सर्व प्रकाराची चौकशी करून छावणी परिषदेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी छावणी विकास युवा मंचने एका निवेदनाद्वारे सहायक पोलीस आयुक्त ज्ञानोबा मुंडे यांच्याकडे केली आहे. निवेदनावर शेख कासीम, मयंक पांडे, अॅड. इद्रीस इब्राहिम, पाशा खान, ओंकार सिंग, सय्यद रशीद, अतुल राठोड, शेख सिद्दीक यांची नावे आहेत.
छावणीत पुन्हा गॅस्ट्रो?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:59 AM