औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत सुरू करण्यात आलेल्या शहर बसने सव्वावर्ष औरंगाबादकरांची सेवा केली. या कालावधीत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला तब्बल ७ कोटी ८७ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. लॉकडाऊनमुळे मागील सहा महिन्यांपासून ही सेवा बंद असली तरी भविष्यात पुन्हा मोठा तोटा सहन करावा लागणार नाही, यासाठी काही व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. शहर बसच्या प्रवाशांना आता स्मार्ट कार्ड दिले जाणार असून, या कार्डला टॉपअपसुद्धा करता येणार आहे. हे कार्ड रिचार्जदेखील करता येणार आहे.
ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एसटी महामंडळाने जवळपास बंदच केली होती. औरंगाबादकरांना खाजगी प्रवासी वाहतुकीशिवाय पर्याय उरलेला नव्हता. शहराची सार्वजनिक वाहतुकीची गरज लक्षात घेऊन महापालिकेसाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बस सेवा सुरू करण्यात आली आहे. २६ जानेवारी २०१८ रोजी या बससेवेचा शुभारंभ झाला. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी राज्यातील व देशातील इतर शहरांतील सिटी बसच्या तुलनेत कमी तिकीट दर ठेवण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला. आजही तो निर्णय कायम आहे.
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सिटी बसच्या तिकीट दराचे प्रमाण ५३ टक्के आहे. एसटी महामंडळाच्या तिकीट दराचे प्रमाण ६३ टक्के असून, नागपूर येथील सिटी बसच्या तिकीट दराचे प्रमाण ७७ टक्के आहे. मध्यंतरीच्या काळात डिझेलचे दर वाढत गेले; पण औरंगाबादच्या स्मार्ट बसचे तिकीट दर मात्र वाढवण्यात आले नाहीत. या सिटी बसच्या तिकीट दराची सुरुवात पाच रुपयांपासून होते. दोन स्टेजसाठी (टप्प्यांसाठी) पाच रुपये तिकीट आकारले जाते. दोन किलोमीटरसाठी दोन रुपये आकारले जातात. कमी तिकीट दरामुळे स्मार्ट बसला वर्षाला ७ कोटी ८७ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याबद्दलचा आढावा संचालक मंडळाने घेतला आणि तिकीट दर स्थिर ठेवण्याचे देखील ठरविण्यात आले. सिटी बसचा होणारा तोटा अन्य मार्गाने भरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला देखील मान्यता दिली.
स्मार्ट कार्डची उपाययोजनाशहर बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता स्मार्ट कार्डची योजना आखण्यात आली आहे. याचा उपयोग प्रामुख्याने विद्यार्थ्यांना होणार आहे. स्मार्ट कार्डवर टॉपअप मारता येणार असून, हे कार्ड रिचार्ज देखील करता येणार आहे. त्याशिवाय कंडक्टर्सला अँड्रॉईड बेस्ड् मशीन तिकिटासाठी दिले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशाला केवळ तीन सेकंदात तिकीट मिळेल. या मशीनमध्ये कार्ड पेमेंट करण्याचीदेखील सुविधा आहे. या मशीनचे प्रशिक्षण सोमवारी वाहकांना देण्यात आले आहे.