नात्यामध्ये लग्न करताय, मग ‘सावधान’! मेजर थॅलेसिमियाग्रस्त मूल जन्माला येण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 04:03 PM2022-05-09T16:03:42+5:302022-05-09T16:05:04+5:30
भीतीपोटी अनेक लोक आपण थॅलेसेमिया मायनर असल्याचे सांगत नाहीत.
औरंगाबाद : शरीरात रक्तनिर्मिती बंद झाल्याने थॅलेसेमिया हा आजार होतो. जवळच्या नात्यात लग्न करण्याचे प्रमाण जास्त असलेल्या समाजात थॅलेसेमिया अधिक प्रमाणात आढळून येतो. त्याबरोबरच दोन ‘मायनर थॅलेसेमिया’ग्रस्तांनी विवाह केला, तर जन्माला येणारे मूल ‘थॅलेसेमिया मेजर’ राहण्याची शक्यता असते. अशा मुलांना दर महिन्याला रक्त द्यावे लागते. ही स्थिती दूर होण्यासाठी विवाहापूर्वी कुंडलीपेक्षा रक्तचाचणी करून थॅलेसिमिया आहे की नाही, हे पाहा, असे तज्ज्ञांनी म्हटले.
दरवर्षी ८ मे हा दिवस जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून पाळण्यात येतो. या रुग्णांची संख्या वाढत असून, बालकांचे प्रमाण जास्त आहे. औरंगाबादेत बाराशे रुग्ण आहेत. औरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटीकडे २६३ रुग्णांची नोंदणी असून, या रुग्णांना २१ दिवसांनी रक्त द्यावे लागते. शरीरात रक्तनिर्मिती बंद झाल्याने हा आजार होतो. बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या माध्यमातून रुग्णास जीवदान मिळू शकते; परंतु बोन मॅरो जुळणे फार महत्त्वाचे ठरते.
मायनर तरुण राष्ट्रीय खेळाडू; पण
शहरात एक ‘थॅलेसेमिया मायनर’ असलेली तरुणी राष्ट्रीय खेळाडू आहे. पतीही मायनर असल्याने ७ वर्षांच्या मुलीस थॅलेसेमिया मेजर आहे. दर २८ दिवसांनी रक्त द्यावे लागत असल्याची खंत तरुणीने व्यक्त केली.
खबरदारी घेता येते
भीतीपोटी अनेक लोक आपण थॅलेसेमिया मायनर असल्याचे सांगत नाहीत. अधिकाधिक जागृती व्हावी. दोन मायनर व्यक्तींचे लग्न झाले, तर मेजर थॅलेसेमियाग्रस्त मूल जन्माला येणार नाही, याची खबरदारी घेता येते.
-अनिल दिवेकर, सचिव, औरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटी
शहरात किमान ७ टक्के लोक
औरंगाबाद जिल्ह्यात लोकसंख्येच्या ५ ते ७ टक्के म्हणजे जवळपास ७० हजार लोक थॅलेसेमिया मायनर असू शकतात. दोन मायनर व्यक्तीमुळे मेजर रुग्ण जन्माला येण्याची भीती असते. त्यामुळे लग्नाआधी तपासणी करून आपण मायनर तर नाही ना, ही खात्री करावी.
-डाॅ. महेंद्रसिंग चौहान
मोफत डे केअर सेंटर
सिडको, एन-२ येथे थॅलेसेमियाग्रस्तांसाठी मोफत डे केअर सेंटर सुरू करण्यात येत असून, रविवारी सेंटरचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामुळे रुग्ण, पालकांचा महिन्याकाठी ५ ते ८ हजारांचा खर्च वाचेल, अशी माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत औरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटीचे अध्यक्ष कैलास अवचरमल, अनिल दिवेकर आणि डाॅ. महेंद्रसिंग चौहान यांनी दिली.