घाटी रुग्णालयाला दुरुस्तीसाठी छदामही मिळेना; कोणी उधारीवरही कामे करेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 05:47 PM2021-10-26T17:47:49+5:302021-10-26T17:50:01+5:30
घाटी रुग्णालयाला औषधी, यंत्रसामुग्री, ऑक्सिजनसाठी लाखो, पण दुरुस्तीला १०० रुपयेही मिळेनात
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : तब्बल ६४ एकर जागेत विस्तारलेल्या घाटी रुग्णालय परिसरात ११० छोट्या-मोठ्या इमारती आहेत. कोरोना प्रादुर्भावात गेल्या १७ महिन्यांत घाटी रुग्णालयाला औषधी, यंत्रसामुग्री, ऑक्सिजनसाठी लाखो रुपयांचा निधी मिळाला. मात्र, त्यांच्या बांधकामाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मिळणारा निधी गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे. या कालावधीत १०० रुपयेही त्यासाठी मिळालेले नाहीत. त्यामुळे कोणी उधारीवर कामे करता का, असे म्हणण्याची वेळ प्रशासनावर ओढावत आहे.
घाटीत विविध इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीसाठी वर्षाकाठी २ कोटींचा निधी देण्यात येतो. यामध्ये रुग्णालयासाठी १ कोटी आणि महाविद्यालयासाठी १ कोटींचा निधी मिळतो. मात्र, कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर हा निधी देणे थांबविण्यात आले. कोरोना उपचारासंदर्भातच निधी देण्यात आला. नियमित देखभाल-दुरुस्तीसाठी निधी नसल्याने दुरुस्तीची कामेच ठप्प आहेत. त्यामुळे रुग्णालयापासून तर वसतिगृहापर्यंत कुठे फरशा उखडल्या आहेत, तर कुठे ड्रेनेजलाइन नादुरुस्त झाली आहे. कुठे छताला गळती लागली आहे, तर कुठे स्वच्छतागृहे तुंबली आहेत. वेळेवर पैसे मिळणार नसल्याची कल्पना असल्याने ही कामे करण्यासाठी नकार दिला जात आहे. अधिष्ठाता डाॅ.वर्षा रोटे-कागिनाळकर यांनी सोमवारी वसतिगृहाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या निधीअभावी इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करता येत नसल्याचे घाटीतील बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले.
५ कोटींची कामे दुरुस्तीविना
घाटी रुग्णालयात सध्या जवळपास ५ कोटींची देखभाल-दुरुस्तीची कामे तशीच पडून आहेत. देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने डाॅक्टर, कर्मचारी, रुग्ण, नातेवाइकांकडून घाटी रुग्णालयाच्या नावाने ओरड होत आहे, परंतु निधीच नसल्याने कामे करणार कशी, असा प्रश्न बांधकाम विभागाला पडला आहे.
घाटी रुग्णालयाची स्थिती :
- ६४ एकरचा परिसर.
- ११० इमारती.
- १.१७ लाख चाैरस मीटर बांधकाम.
- १० ते १२ मोठ्या इमारती.
- अनेक ६५ वर्षांहून जुन्या अन् जीर्ण.