औरंगाबाद : शेतविक्रीतून आलेले २१ लाख रुपये मुलगी आणि जावयानेच वृद्ध महिलेच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेत बँकेतून परस्पर काढून घेतल्याचे समोर आले. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
निहालसिंग जारवाल आणि शांताबाई जारवाल (रा. शिवाजीनगर), अशी गुन्हा नोंद झालेल्या जावई आणि मुलीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार चंपाबाई रामलाल गोमलाडू (वय ७५, रा. देवगावरंगारी, ता. कन्नड) यांनी त्यांची जमीन विक्री केली होती. यातून मिळालेले २१ लाख ३१ हजार रुपये त्यांनी त्यांच्या बँक खात्यात जमा करून ठेवले होते. चंपाबाई या आठ वर्षांपासून आरोपी जावई आणि मुलीच्या घरी राहत होत्या. दरम्यान, २८ मार्च २०१८ ते २५ एप्रिल २०१९ या कालावधीत जावई जारवाल त्यांना म्हणाला की, तुमच्या बँकेत कमी व्याज मिळते आणि त्यावर टॅक्सही लागतो. यामुळे तुम्ही माझ्या ओळखीच्या बँकेत पैसे ठेवा.
जावयावर विश्वास ठेवून चंपाबाई यांनी त्यांच्या बँकेतून २१ लाख ३१ हजार रुपये काढून आणले आणि ती रक्कम जावयाने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या बँकेत ठेवली. त्यावेळी जारवाल दाम्पत्याने वृद्धेच्या अडाणीपणाचा लाभ घेत पैसे काढण्याच्या स्लिपवर त्यांच्या सह्या घेतल्या. त्यानंतर त्या बँकेतून दुसऱ्या दिवशी बँकेत ठेवलेली सर्व रक्कम परस्पर काढून घेतली. दरम्यान, वृद्ध चंपाबार्इंना पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी जावई आणि मुलीला बँकेत जाऊन पैसे काढून आणू असे म्हणाल्या.
मात्र,त्यांनी चंपाबाई यांना बँकेत नेले नाही. याबाबत संशय आल्याने चंपाबार्इंनी लहान जावई आणि मुलाला याबाबत सांगितले. लहान जावई आणि मुलाने बँकेत जाऊन पैशाबाबत खात्री केली असता बँकेत पैसे जमा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जारवाल यांनी पैसे काढल्याचे त्यांना समजले. याप्रकरणी चंपाबाई यांनी जवाहरनगर ठाण्यात तक्रार नोंदविली.