शहरवासीयांच्या सहभागातून गोगाबाबा टेकडी करणार हिरवीगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:04 AM2021-09-13T04:04:20+5:302021-09-13T04:04:20+5:30
औरंगाबाद : शहरवासीयांच्या सहभागातून गोगाबाबा टेकडी हिरवीगार करण्यात येणार आहे. या परिसरात प्रत्येकाने किमान २ वृक्ष लावून त्यांचे संवर्धन ...
औरंगाबाद : शहरवासीयांच्या सहभागातून गोगाबाबा टेकडी हिरवीगार करण्यात येणार आहे. या परिसरात प्रत्येकाने किमान २ वृक्ष लावून त्यांचे संवर्धन करावे, जेणेकरून ही टेकडी ऑक्सिजन हब होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी १२ सप्टेंबरला आयोजित कार्यक्रमात केले.
बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईने मराठवाडा इको बटालियनच्या जवानांना राहण्यासाठी कंटेनर केबिन भेट दिली. त्या केबिनचे उद्घाटन सुनील चव्हाण यांच्या हस्ते झाले. शहरातील अनेक भागांत वृक्षारोपण करण्याचा विडा उचलल्याबद्दल यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी क्रेडाईच्या कार्याचे कौतुक केले.
मराठवाडा इको बटालियन गोगाबाबा टेकडी परिसर पूर्णपणे हिरवीगार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मराठवाड्याचे जंगल क्षेत्र वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी एसडीएम रामेश्वर रोडगे, कर्नल मिथील जयकर, क्रेडाईचे अध्यक्ष नितीन बगडिया, राज्य क्रेडाईचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा, उपाध्यक्ष विकास चौधरी, संग्राम पटारे, सचिव अखिल खन्ना, सौरभ गुप्ता, अजितसिंग, राजेंद्रसिंग राजपाल, नवीन बगडिया, हॅप्पी सिंग अन्य पदाधिकारी व इको बटालियनचे जवानांची उपस्थिती होती.
कॅप्शन
गोगाबाबा टेकडी येथे मराठवाडा इको बटालियनमधील जवानांना राहण्यासाठी कंटेनर केबिन क्रेडाईतर्फे भेट देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, क्रेडाईचे अध्यक्ष नितीन बगडिया अन्य पदाधिकारी व बटालियनचे जवान.