- संतोष हिरेमठऔरंगाबाद : काही वर्षांपूर्वी सोन्याचा दात बसविणे, हे श्रीमंतीचे लक्षणं मानले जात होते. अनेकांच्या दातांमध्ये एखाद दुसरा सोन्याचा दात चमकत असे. मात्र, आता सोन्याचा भाव प्रति तोळा ५२ हजार २०० रुपयांवर गेला आहे. त्यामुळे ‘सोन्याचा दात नको रे बाबा...’ म्हटले जाते आहे. त्यापेक्षा पांढरे शुभ्र दातच बरे, असे म्हणत दात शुभ्र करून घेण्याकडे कल वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
काही वर्षांपूर्वी जर कोणी हसल्यावर त्याचे दात चमकताना दिसत असे. ही चमक सोन्याच्या दातांची असे. सोन्याचे दात पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकीत होऊन जात असे. सोन्याला नोबल अलाॅय म्हणजे शुद्ध धातू म्हटले जाते. त्यामुळे अनेकजण पूर्ण शुद्ध सोन्याचे दात बसवून घेत असे. नंतर जॅपनीज गोल्डपासूनही दात बनविणे सुरू झाले. परंतु, दातांच्या सोन्याची चमक आता मागे पडली आहे. कारण सोन्याचे दात बसवायचा, असे म्हणत दंत वैद्यांकडे येणाऱ्यांचे प्रमाण नगण्य झाले आहे. एका दंत वैद्यांनी सांगितले की, गेल्या १० वर्षांत केवळ आठ लोकांनी माझ्याकडे सोन्याचा दात बसवून घेतला.
सोन्याचा भाव - प्रति तोळा ५२ हजार २०० रुपयेएका सोन्याच्या दातासाठी लागणारा खर्च - किमान ३० ते ३५ हजार रुपये
सौंदर्याची कल्पना बदललीसौंदर्याची कल्पना आता बदलली आहे. पूर्वी शासकीय दंत महाविद्यालयात सोन्याचे दात बनविले जात असे. परंतु, आता कोणी सोन्याचे दात बसवीत नाहीत. सर्वांना पांढरे दात हवे आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या दाताच्या रंगाच्या शेडनुसार सिरॅमिकचे दात बनविले जातात.- डाॅ. शिरीष खेडगीकर, सहयोगी प्राध्यापक, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय
प्रमाण एक टक्क्यांपेक्षा कमीशुद्ध सोन्याचे दात पूर्वी बनवून बसविले जात असे. आता सोन्याचे भाव खूप वाढला आहे. २५ वर्षांपूर्वीची तुलना केली तर आता त्या तुलनेत सोन्याचे दात बसविण्याचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.- डाॅ. हिमांशू गुप्ता, माजी अध्यक्ष, इंडियन डेंटल असोसिएशन औरंगाबाद
पूर्वी पसंती, आता नाहीसोन्याचे दात बसविण्यास पूर्वी काही लोकांकडून पसंती दिली जात होती. परंतु, आता सोन्याचे दात बसविण्यासाठी कोणी येत नाही. पांढरे शुभ्र दात पाहिजे, असा आग्रह अलीकडे वाढला आहे. दातात छिद्र पाडून डायमंड बसवितात; परंतु हा कल अजून आपल्याकडे नाही.- डाॅ. लक्ष्मीकांत बिचिले, दंतवैद्य