मराठी चित्रपटांना चांगले दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:31 AM2018-01-23T00:31:15+5:302018-01-23T00:31:18+5:30
गेल्या दहा वर्षांत मराठी चित्रपटात बदल झाला असून, राष्ट्रीय पुरस्कारासाठी अग्रस्थानी असलेल्या मल्याळम, तामिळी चित्रपटांची जागा आता मराठी सिनेमा घेत आहेत, असे मत दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते पद्मविभूषण अदूर गोपालकृष्णन यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘गेल्या दहा वर्षांत मराठी चित्रपटात बदल झाला असून, राष्ट्रीय पुरस्कारासाठी अग्रस्थानी असलेल्या मल्याळम, तामिळी चित्रपटांची जागा आता मराठी सिनेमा घेत आहेत, असे मत दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते पद्मविभूषण अदूर गोपालकृष्णन यांनी व्यक्त केले. शहरात आयोजित पाचव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात रविवारी ते बोलत होते. या महोत्सवात क्षितिज चित्रपटाने प्रथम क्रमांक पटकावला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय केंद्र औरंगाबाद, नाथ ग्रुप, एमजीएमतर्फे प्रोझोन मॉलच्या आयनॉक्स थिएटरमध्ये या महोत्सवाचे आयोजन केले होते. सांगता समारंभात महोत्सवाचे संचालक अशोक राणे, अभिनेता उपेंद्र लिमये, परीक्षक विकास देसाई, अॅनी कॅटलिग, अजित दळवी, सुजाता कांगो, सचिन मुळे, नंदकिशोर कागलीवाल, सतीश कागलीवाल, दासू वैद्य, डॉ. रेखा शेळके, सिद्धार्थ मनोहर, विजय कान्हेकर, दत्ता बाळसराफ, मोहम्मद अर्शद, शिव कदम, नीलेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी गोपालकृष्णन म्हणाले, माझ्यावर व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या गाण्याचा प्रभाव होता. साठच्या दशकात मी पुण्याच्या एफटीआयला प्रवेश घेतला. याठिकाणी तेव्हा मराठी मुले दुर्मिळ होती. मराठी भाषा, नाटक, संगीत यांची महाराष्ट्रात एक मोठी परंपरा आहे. गेल्या दहा वर्षांत मराठी सिनेमांना चांगला काळ आला
आहे. जयप्रद देसाई यांनी सूत्रसंचालन केले.