औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी, ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिर आता होणार भव्यदिव्य
By प्रशांत तेलवाडकर | Published: August 30, 2022 05:27 PM2022-08-30T17:27:30+5:302022-08-30T17:28:25+5:30
गणेशोत्सव सुरु करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी देखील घेतले होते संस्थान गणपतीचे दर्शन.
औरंगाबाद : शहराचे ग्रामदैवत राजाबाजारातील संस्थान गणपती मंदिर आता आकाराने मोठे होणार आहे. विश्वस्तांनी मंदिराच्या बाजूची जागा खरेदी केली असून, आणखी जागा खरेदीचा प्रयत्न सुरु आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर ही गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे.
राजाबाजारातील संस्थान गणपती मंदिर मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. गणेशोत्सव सुरु करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यापासून ते शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंपर्यंत सर्व महान नेत्यांनी येऊन गणपतीचे दर्शन घेतले आहे. याच मंदिरापासून गणेशोत्सवाची सुरुवात, विसर्जन मिरवणूक, गुढीपाडवा शोभायात्रा, महापुरुषांच्या जयंती मिरवणूक याच मंदिरापासून सुरुवात होत असते.
सुमारे साडेतीनशे वर्षे हे मंदिर जुने आहे. १९९४ - १९९५ यावर्षी बजरंगलाल शर्मा अध्यक्ष असताना मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. सुमारे ३५० स्वे. फुटातील संपूर्ण मंदिर संगमरवरी करण्यात आले. २ वर्षांपूर्वी येथे गणेश मूर्तीचे वज्रलेपन करण्यात आले होते. जागा कमी पडत असल्याने संस्थान गणपतीचे रुपांतर भव्य मंदिरात व्हावे, अशी भाविकांची इच्छा होती. त्यानुसार आता विश्वस्त मंडळाने मंदिराच्या डाव्या बाजूची सुमारे १,४०० स्वे. फूट जागा विकत घेतली आहे. पाठीमागील सुमारे १,६०० स्वे. फूट जागा विकत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ते शक्य झाल्यास येत्या २ ते ३ वर्षात ३,३५० स्वे. फुटांचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थान गणपती मंदिर ट्रस्टचे सचिव प्रफुल्ल मालाणी यांनी दिली.
६० किलो तुरटीपासून संस्थान गणपतीची प्रतिकृती
संस्थान गणपतीच्या प्रतिकृतीची दरवर्षी गणेशोत्सवात स्थापना करण्यात येते. पूर्वी पीओपीची मूर्ती बसविण्यात येत असे. मात्र, मागील ९ वर्षांपासून शाडू मातीची मूर्ती बसविण्यात येते. यंदा यापुढे एक पाऊल टाकून ६० किलो तुरटीची श्रींची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. यासंदर्भात मूर्तिकार दिनेश बगले यांनी सांगितले की, पहिल्यांदाच तुरटीची मूर्ती तयार करण्यात आली आहे. यात तुरटीचे गरम पाणी करून साच्यात टाकण्यात आले व मूर्ती तयार करण्यात आली. बुधवारी विधीवत या मूर्तीची स्थापना होईल.