बेरोजगारांसाठी खुशखबर, नोकर भरतीचा पहिला टप्पा होईना तोच पालिकेचा दुसऱ्याचा प्रस्ताव
By मुजीब देवणीकर | Published: September 27, 2023 01:48 PM2023-09-27T13:48:48+5:302023-09-27T13:49:11+5:30
पहिल्या टप्प्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना मनपाने आणखी २८६ पदे भरण्यासाठी तयारी सुरू केली.
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेत ११४ पदांच्या नोकर भरतीचा पहिला टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही. ९ हजार ८०० विद्यार्थी परीक्षा कधी होईल, याकडे लक्ष ठेवून आहेत. त्यातच मनपा प्रशासनाने भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू केली. २८६ पदे भरण्यासाठी शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी दिली.
महापालिकेने भरतीसाठी शासन नियुक्त आयपीबीएस कंपनीची निवड केली. या कंपनीमार्फत ११४ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. विविध पदांसाठी ९ हजार ८०० उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले. लवकरच कंपनीमार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना मनपाने आणखी २८६ पदे भरण्यासाठी तयारी सुरू केली. प्रशासक जी. श्रीकांत यांनी पदभरतीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आस्थापना विभागामार्फत वर्ग ३ मधील पदांची भरती केली जाणार असल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून बिंदुनामावली मंजूर करून घेण्यात आली. संवर्गनिहाय आणि आरक्षणानुसार पदांची भरती होणार आहे. मनपाने २८६ पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला.
अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितले की, मनपाने २८६ पदांच्या भरतीची तयारी सुरू केली असून, शासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. शासनाकडून मान्यता मिळताच या पदांची भरतीदेखील आयपीबीएस कंपनीमार्फत केली जाणार आहे. आयपीबीएस कंपनीसोबत करार करण्यात आला असून, या कंपनीकडे २८६ पदांचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. कंपनीकडून जाहिरात तयार करून घेण्यात येईल. त्यानंतर जाहिरात काढली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.