ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान, अधिकारी-कर्मचाऱ्यांना धन कधी मिळणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 06:04 PM2021-03-23T18:04:04+5:302021-03-23T18:06:54+5:30
ग्रामपंचायत निवडणुका होऊन सरले अडीच महिने झाले तरी मानधन मिळण्याची प्रतीक्षा
औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया ३३ दिवस चालली. यामध्ये सुमारे १२ हजार महसूल, जिल्हा परिषदेचे आणि तितकेच पोलीस कर्मचारी निवडणूक शांततेत, शिस्तीत आणि सुरळीत पार पडण्यासाठी राबले. या मेहनतीपोटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा कायम आहे.
कोरोनाचे संकट त्यात ग्रामपंचायत निवडणुकीत प्रशासकीय यंत्रणेने राबराब राबवून घेतले; परंतु लालफितीच्या कारभारामुळे मानधन मिळालेले नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील ५७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. ३२ ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध, तर ६ ठिकाणी निवडणूकच घेतली गेली नाही. जिल्ह्यातील ३ कोटी २ लाख रुपयांचा चुराडा झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा निवडणूक व्यवस्थापन खर्चात कपात केली असली तरी निवडणूक नियोजनासाठी जेवढा खर्च लागणार आहे, तेवढा करावाच लागला. प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुमारे ४९ हजार रुपये प्रशासकीय खर्च झाला. प्रशिक्षण, मतदान आणि मतमोजणी या प्रक्रियेसह इतर कामांत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात येते. २३ हजार ३५६ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी दीड ते दोन कोटींचा निधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
निधीची अडचण
अनुदान आले आहे. ते किती आले आहे, ते अद्याप कळलेले नाही. येत्या एक- दोन दिवसांत जे अनुदान आले ते वाटप करण्यात येईल. पूर्ण अनुदान आलेले नाही. मानधन कुणाला किती द्यायचे ते तहसील पातळीवर ठरविण्यात येते, असे निवडणुकीनंतर सांगण्यात आले होते, तर यासंदर्भात बोलताना तहसीलदार शंकर लाड म्हणाले, अद्याप निधी न आल्याने अनुदान वाटप करण्यात आलेले नाही.
जिल्ह्यातील किती ग्रामपंचायतींची झाली निवडणूक -६१७
निवडणुकीत कर्तव्य बजावलेले अधिकारी - २००
इतर कर्मचारी किती - २३,१५६
तालुकानिहाय आढावा
तालुका- ग्रामपंचायती - अधिकारी-कर्मचारी
वैजापूर- १०५ -३९००
सिल्लोड- ८३ -३१५४
कन्नड -८३ -३१५४
पैठण -८० -३०४०
औरंगाबाद -७७ -२९२६
गंगापूर -७१ -२६९८
फुलंब्री -५३ -२०१४
सोयगाव -४० -१५२०
खुलताबाद- २५ -९५०